घरखर्चासाठी विवाहितेचा छळ; अखेर मायलेकींची आत्महत्या, औरंगाबाद जिल्ह्यातील धक्कादायक घटना

दीपक जोशी
Tuesday, 10 November 2020

भावी संसाराची स्वप्ने रंगविण्यापूर्वीच माहेराहून घरखर्चासाठी २० हजार घेऊन ये. या एका कारणामुळे सासरकडून सततच्या छळाला कंटाळून विवाहितेने अखेर विहिरीत जीव देऊन आपली जीवननौका संपवली.

लिंबेजळगाव (जि.औरंगाबाद) : भावी संसाराची स्वप्ने रंगविण्यापूर्वीच माहेराहून घरखर्चासाठी २० हजार घेऊन ये. या एका कारणामुळे सासरकडून सततच्या छळाला कंटाळून विवाहितेने अखेर विहिरीत जीव देऊन आपली जीवननौका संपवली. या प्रकरणी फिर्यादीवरून वाळूज पोलिसांनी पतीसह सासूच्या विरोधात  मंगळवारी (ता.दहा) गुन्हा दाखल केला आहे. या विषयी पोलिसांनी माहिती दिली की, सलबतपूर (ता.नेवासा, जि.अहमदनगर) येथील आत्माराम गवळी यांची एकुलती एक मुलगी योगिता हिचे लग्न दहेगाव बंगला (ता.गंगापूर) शिवारातील राऊतच्या कुटुंबातील विठ्ठल नानासाहेब याच्याशी पाच वर्षांपूर्वी झाले होते. ते सर्वजण राऊत वस्तीवर राहात होते.

एक खिडकी सुविधेतून मिळणार पदवीधरसाठी विविध परवानग्या, औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

त्यांना प्रगती (वय ४) व चौदा महिन्यांची अक्षता अशा दोन मुली होत्या. दरम्यान घरखर्चासाठी पतीसह सासू माहेराहून २० हजारांची मागणी करीत असल्याचे योगिताने ता.५ नोव्हेंबरला आपल्या वडिलांना फोनवर सांगितले होते. त्यावर एवढे पैसे कुठून आणू?असे म्हणत वडिलांनी मुलीची समजुत काढली. त्यानंतर पती विठ्ठल व सासु गयाबाई हे दोघे केवळ पैशासाठी मला शिवीगाळ करुन मारहाण करीत असल्याची माहिती तिने पुन्हा ८ नोव्हेंबरला आपल्या वडिलांना दिली होती. त्यानंतर पती विठ्ठलने सोमवारी (ता.९) सासऱ्याला फोनवर सांगितले की मुलगी अक्षता विहिरीत पडली असून योगिताही गायब आहे. त्यामुळे भाऊ गोरखनाथ गवळी, पत्नी आशाबाई व इतर नातेवाईकासह माहेरकडील मंडळीने दहेगाव शिवार गाठले. तेव्हा तेथे कळाले की, मुलगी योगिता व अक्षता या दोन्ही विहीरीत मृतावस्थेत आढळून आल्या.

पंकजा मुंडे नाराज नाहीत, मी हात जोडून सांगतो! चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना केली विनंती

औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात दोघींचे शवविच्छेदन झाल्यानंतर रितीरिवाजानुसार दहेगावात त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान आज मंगळवारी मृत मुलीचे वडिल आत्माराम पुंजाराम गवळी यांनी वाळूज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले की, मुलगी योगिता व अक्षता हिच्या मृत्युस सासुसह पती जबाबदार आहे. त्यावरून वाळूज पोलिसांनी पती विठ्ठल नानासाहेब राऊत आणि सासु गयाबाई नानासाहेब या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शेळके, सहायक पोलिस उपनिरीक्षक नारायण बुट्टे आदी करीत आहेत.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mother And Her Daughter Committed Suicide, In Laws Demanding Twenty Thousand