पंकजा मुंडे नाराज नाहीत, मी हात जोडून सांगतो! चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना केली विनंती

टीम ई सकाळ
Tuesday, 10 November 2020

शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे पंकजा मुंडे नाराज नाहीत, असे मी हात जोडून सांगतो. विनंती आहे, जशी बातमी आहे, तशीच द्या, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

औरंगाबाद : शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे पंकजा मुंडे नाराज नाहीत, असे मी हात जोडून सांगतो. विनंती आहे, जशी बातमी आहे, तशीच द्या, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. सोमवारी (ता.नऊ) येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील तीन पदवीधर आणि दोन मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा श्री.पाटील यांनी येथे केली. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत पक्षाचे बंडखोर उतरले आहेत. याबाबत श्री.पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, की राजकारणात काय अन् घरात काय एकाला न्याय मिळाला तर चार जणांवर अन्याय होणारच. उमेदवारीवरून कोणाची नाराजी असेल तर त्यांची समजूत काढली जाईल.

राजकारणात काय अन् घरात काय एकाला न्याय मिळाला तर चार जणांवर अन्याय होणारच : चंद्रकांत पाटील

पुण्यातून संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली असून ते काही माझे जावई नाहीत. प्रवीण घुगे यांना उमेदवारी न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज नाहीत. माध्यमांना हात जोडून विनंती करतो. मुंडे यांच्या घरी चहापान झाले. त्या कारखान्याच्या कामात व्यस्त असल्यामुळे त्या आज आल्या नाहीत. त्यांचा एमएमएस देखील आला. कार्यकर्ते प्रेमापोटी लिहित असतात. त्याचा अर्थ मुंडे नाराज आहेत, असा होत नाही, असे सोशल मीडियावरील समर्थकांच्या नाराजीविषयी लिहिलेल्या पोस्टविषयी श्री.पाटील यांनी सांगितले. यावेळी शिरीष बोराळकर, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खासदार  प्रीतम मुंडे, भागवत कराड, आमदार हरिभाऊ बागडे, संभाजी पाटील निलंगेकर, अतुल भावे, संजय केणेकर, विजय औताडे, भगवान घडामोडे, समीर राजूरकर, प्रमोद राठोड, अनुराधा चव्हाण  आदींची उपस्थिती होती.

औरंगाबादमध्ये ३९ हजार नागरिक आजारी, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेतून माहिती आली समोर

मुंडे यांनी केले ट्विट
पंकजा मुंडे यांनी आपण नाराज नसल्याचे ट्विट करुन माहिती दिली. त्या म्हणाल्या, की भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची व माझी दोन दिवसांपूर्वी भेट झाली होती. यात सविस्तर चर्चाही झाली. मराठवाड्यातील बैठकांना उपस्थित राहू शकत नाही. याबद्दलही बोलणे झाले. ही संघटनेची आढावा बैठक होती. त्यापूर्वीच्या संध्याकाळी मी कोअर कमिटीची बैठक केली होती. दादा माझ्या घरी सात तारखेला नाष्टा करण्यासाठी आले होते. आमच्या छान गप्पाही झाल्या.  

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pankaja Munde Not Upset, I Am Saying Chandrakant Patil Appeal To Media