औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून मोठा बदल, संपर्कमंत्री म्हणून यांची निवड

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 December 2020

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे औरंगाबाद जिल्हा संपर्कमंत्री पद आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे सोपविले आहे. यापूर्वी हे पद सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडें यांच्याकडे होते.

औरंगाबाद : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे औरंगाबाद जिल्हा संपर्कमंत्री पद आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे सोपविले आहे. यापूर्वी हे पद सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडें यांच्याकडे होते. ‘राष्ट्रवादी’च्या मुंबईत नुकत्याच झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात ही नियुक्ती करण्यात आली. आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे यांनी परिस्थिती उत्तमरित्या सांभाळली. त्यांच्या अथक मेहनतीचे कौतूक सर्वत्र होत आहे. कोरोना काळातील त्यांची धडपड पक्षासोबतच जनतेनेही बघितली. त्यांच्या याच कामामुळे जनतेतही त्यांची अधिच चांगली छबी निर्माण झाली.

 

 

ही एक जमेची बाजू राजेश टोपे यांच्याकडे आहे. त्यांच्या कामाची चूणूक व टोपे यांचा सतत मुंबई-जालना दौरा असतो. त्यांचा सातत्याने औरंगाबादशी कनेक्ट येतो. दळणवळणाच्या दृष्टीनेही राजेश टोपे यांना औरंगाबादचे संपर्कमंत्रीपद अधिक सोपे असून ही महत्त्वाची बाब ओळखून त्यांना हे पद दिल्याचे समजते. कोरोनाच्या संसर्गापुर्वी धनंजय मुंडे यांची औरंगाबादचे संपर्कमंत्री म्हणून वर्णी लागली होती. परंतू त्यानंतर सुरु झालेल्या कोरोना संसर्गामुळे मुंडे यांना शहरासोबत ‘कनेक्ट’ ठेवता आला नव्हता. तोंडावर आलेली स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक व आगामी काळातील महापालिकांच्या निवडणूकीच्या धर्तीवरही हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Appointed Rajesh Tope As Minister Of Liaison Aurangabad News