मान अन् पाठीत वेदना, हाडेही दुखू लागली...पण का, कशामुळे?

मनोज साखरे
शनिवार, 4 जुलै 2020

लॉकडाउनच्या काळात बहुतांश लोक घरीच बसून आहेत. दोन अडीच महिने व्यायामासाठी बाहेरही जाता आले नाही. शिवाय वर्क फ्रॉम होममुळे एकाच जागेवर बसून काम करण्याची वेळ आली. त्यामुळे मान, पाठीचे दुखणे डोके वर काढू लागले आहे. एकंदरीतच हाडांची दुखणी वाढली आहेत. 

औरंगाबाद - एकीकडे कोरोनाचा संसर्ग आणि दुसरीकडे लॉकडाउनच्या काळात घरात बसून कंटाळला असाल. वर्क फ्रॉम होममुळे मान आणि पाठीत वेदनाही जाणवत असतील. या काळात तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत हाडे दुखण्याच्या समस्या वाढल्याचे जाणवत आहे. पण काळजी करू नका. प्राणायाम, योग केल्यास आणि डॉक्टरांचा सल्ला आपण पाळला तर चिंता करण्याची गरजच नाही. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

जीवनपद्धतीत बदल
कोरोनाच्या संसर्गानंतर आपल्या जीवनपद्धतीत बरेचसे बदल झाले आहेत. काही बदल आपण स्वीकारले; परंतु काही बदल अजूनही आपल्या अंगवळणी फारसे पडले नाहीत. वर्क फ्रॉम होम ही संकल्पनाही अशीच. ही संकल्पना फायदेशीरच, रस्त्यावरील वाहतूक कमी होण्यापासूनच प्रदूषण, अपघात कमी होण्यातही याचा लाभ आहे; पण घरातच सातत्याने संगणकावर काम करताना पाठ व मानेला ताण पडून त्रास होण्याचा धोकाही आहे. दुसरी बाब अशी, की ज्यांना घरातच बसावे लागत आहे अशा व्यक्तींतही हाडांचे आजार बळावत आहेत. या समस्यांवर उपायांबाबत डॉ. सचिन फडणीस यांनी मोलाचे सल्ले दिले आहेत. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

हे आवश्‍यकच.. 

  • एकाच जागी बसल्याने हाडे दुखण्याचा, गुडघेदुखीचा त्रास जाणवतो. 
  • त्यासाठीच रोज शरीराची हालचाल करावी. त्यामुळे हाडे ठिसूळ होत नाही. 
  • सांध्यांची हालचाल करावी. अधूनमधून रिलॅक्स व्हावे. 
  • टीव्हीसमोर बसून निगेटिव्हिटी वाढवण्याऐवजी इतर गोष्टींत मन वळवा. 
  • बागेत काम करा. व्यायाम करा. पुस्तके वाचा. 
  • घरात सारखे बसू नका. छंद जोपासा. स्वयंपाकातही मदत करू शकता. 

फुप्फुसांची कार्यक्षमता वाढवा 
आपले ३० टक्के फुप्फुस ‘अनयूज’ असते. त्याची ताकद वाढविण्यासाठी प्राणायाम करायला हवेत. त्यामुळे फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते. कोविड विषाणूचा संसर्ग आणि फुप्फुसांचा संबंध आहे. चालणे, योग व प्राणायामाने आत्मविश्‍वासही वाढतो. 

हल्ली आपण आपली सर्व कामे मोबाईलवर करतो. वर्क फ्रॉम होममध्ये संगणकावरही खूप काळ असतो. परिणामी डोळ्यांवर ताण पडतो आणि पाठ व मानदुखीची समस्या उद्भवते. त्यामुळे संगणकावर तासभर काम केल्यानंतर पंधरा मिनिटे ब्रेक घ्या. तुम्ही जर तरुण असाल तर परिणाम जाणवत नाही; पण कामातून थोडा वेळ उसंत घेतलेली बरी. 
-डॉ. सचिन फडणीस, अस्थिरोगतज्ज्ञ, नियोजित अध्यक्ष, आयएमए 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Neck and back pain, bones also started to hurt.