esakal | वेदनादायी : भाकर करंटी; रक्तात नाहली
sakal

बोलून बातमी शोधा

News About Karmad railway accident

परप्रांतीय तरुण कामगारांचा चटका लावणारा अंत

वेदनादायी : भाकर करंटी; रक्तात नाहली

sakal_logo
By
संतोष शेळके

करमाड, (जि. औरंगाबाद) : जगात सगळ्या गोष्टीचे सोंग आणता येते. पण, भुकेचे नाही. तेही आपली, आपल्या कुटुंबीयांची भूक मिटविण्यासाठी मध्यप्रदेशातून जालन्यात आले होते. वयच काय होते त्यांचे, विशी-तिशीचे. सळसळते रक्त असल्याने मेहनतीचे काम करून त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. पण, अचानक लॉकडॉउनमुळे काम गेले. घरही लांब होते. त्यामुळे ज्या भाकरीसाठी ते आले होते त्या भाकरी घेऊन ते पायीच निघाले. पण, रेल्वेच्या रूपात काळ आला नि त्यांची करंटी भाकर रक्तात नाहली. क्षणात होत्याचे नव्हते झाले. 

करमाडच्या पूर्वेकडील सटाणा (ता. औरंगाबाद) शिवारात शुक्रवारी (ता. आठ) पहाटे ही घटना घडली. यात १६ तरुण मजूर ठार झाले तर चौघे गंभीर जखमी झाले. दोघे बालबाल बचावले. ते जालना येथील एका स्टील कंपनीत रोजंदारीवर काम करीत होते. मात्र, लॉकडाउनने काम बंद झाले. दीड महिन्यात हाती असलेले सगळे पैसे संपले. त्यामुळे खाण्यापिण्याचे वांधे होत असल्याने ते गावाकडे निघाले होते.

भुसावळ येथून मध्यप्रदेशला जाण्यासाठी विशेष रेल्वे असल्याचे त्यांना कळाले. महामार्गावरून गेल्यास रस्ता चुकण्याची शक्यता, वाढते अंतर आणि रस्त्यांवर असलेल्या पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी त्यांनी रेल्वेरुळाचा मार्ग निवडला. रात्रभर चालून थकल्याने सटाणाजवळ त्यांनी रुळावर अंग टाकले. पण, मालगाडी आली आणि घात झाला. ज्या भाकरीसाठी ते आले त्याच भाकरी आज त्यांच्या रक्तात नाहाल्या. भाकरीचे गाठोडे उशाला असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. कवी प्रवीण हटकर यांच्या ओळीची प्रचिती आली. ते म्हणतात - 
‘भाकर करंटी 
रक्तात नाहली; 
वांझोटी राहिली 
भोगाविना।’ 

 
हा अपघात नव्हे तर एक प्रकारची हत्याच असं कोण म्हणालं
 
गावी जाण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले 
जालना येथून निघताना भीक मागून गोळा केलेल्या आहे तेवढ्या भाजी-भाकरीवर ताव मारून ते सटाणा शिवारात विसावले. थकलेल्या या कामगारांना झोप कधी लागली हे कळलेच नाही. पहाटे जालन्याहून औरंगाबादकडे जाणाऱ्‍या मालगाडीने त्यांना चिरडले. त्यामुळे गावाकडे जाण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले. 
 
अस्वस्थ वर्तमान
 
घराबाहेर पडलेला बाबा आता कधीच येणार नाही 
या अपघातातून वाचलेले दोन जण चुलते-पुतणे आहेत. ते जानेवारीतच जालन्यात आले होते. येथे अन्न-पाण्यावाचून हाल होत होते तर गावाकडे आई, बायको व दोन छोटी रोजच नजरेसमोर येत असल्याने गावी निघाल्याचे या अपघातातून वाचलेल्या एका मजुराने सांगितले. ठार झालेल्यांपैकी काहींना लहान-लहान मुलं आहेत. त्यांच्यासाठी घराबाहेर पडलेला बाबा आता कायमचाच हे जग सोडून गेला, तो कधीच येणार नाही, हे त्यांना कोण आणि कसे सांगणार? 
 


 

go to top