मराठवाड्याच्या रेल्वे प्रश्‍नाला न्याय मिळणार का? 

अनिल जमधडे
Friday, 31 January 2020

अर्थसंकल्पाकडे लक्ष : रखडलेल्या मार्गाच्या पूर्णत्वाची मागणी 

औरंगाबाद : मराठवाड्यातील रेल्वेचे प्रश्‍न वर्षानुवर्ष प्रलंबितच ठेवले जात आहेत. त्यामुळे रेल्वे बोर्ड, दक्षिण मध्य रेल्वेच्या विरोधात येथील नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात तरी मराठवाड्याच्या रेल्वेला झुकते माप मिळेल, अशी अपेक्षा आहे. 

काय आहेत प्रश्‍न? 

मराठवाड्यासाठी महत्त्वाचे असणारे औरंगाबाद-दौलताबाद-कन्नड-चाळीसगाव हा केवळ 88 किलोमीटरचा रेल्वे मार्ग प्रलंबित आहे. जालना-खामगाव केवळ 165 किलोमीटरचा मार्ग प्रलंबित आहे. रोटेगाव-कोपरगाव तर अवघ्या 22 किलोमीटरचा मार्ग आहे. हे तीनही मार्ग अत्यल्प खर्चाचे आहेत. कमी खर्चाच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या या मार्गाकडेही रेल्वे मंत्रालयाने लक्ष देणे आवश्‍यक आहे. पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादशी संबंधित रेल्वे मार्ग रखडल्याने या भागाच्या पर्यटनावर विपरीत परिणाम झाला आहे. 

का वाढलाय ऑनलाईन वीजबिल भरणा 

अवघे  22 किलोमिटर 

रोटेगाव-कोपरगाव तर अवघ्या 22 किलोमीटरचा मार्ग आहे. हा मार्ग पूर्ण झाला तर थेट पश्‍चिम महाराष्ट्राशी मराठवाडा जोडला जातो. त्याचप्रमाणे शिर्डी जाणाऱ्या भाविकांचे अंतर 85 किलोमीटरने कमी होणार आहे. जालना-खामगाव मार्गामुळे मराठवाडा विदर्भाशी जोडला जाणार आहे. औरंगाबाद-चाळीसगाव मार्ग पूर्ण झाला; तर खानदेशाशी मराठवाडा जोडला जाणार आहे. त्यामुळे हे रखडलेले रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करावेत. याशिवाय सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद-बीड-गेवराई व्हाया पैठण-औरंगाबाद-घृष्णेश्वर-अजिंठा-जळगाव या 450 किलोमीटर मार्गाचा आणि जालना-खामगाव हे रेल्वे मार्ग मार्गी लावण्याची मागणी आहे. 

सत्तेतल्या नेत्यांनो, वायफळ बडबड करू नका

भरीव तरतुदीची मागणी 

नांदेड व बिदर या तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या नांदेड-बिदर या 155 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाला त्याचप्रमाणे मनमाड-मालेगाव-इंदूर, उस्मानाबाद-बीड या रेल्वेमार्गांना रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिलेली आहे. असे असले तरीही औरंगाबादशी निगडित अत्यल्प खर्चाचे आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्‍नाकडे रेल्वे मंत्रालय जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची भावना या भागातील नागरिकांमध्ये आहे. म्हणूनच यंदाच्या अर्थसंकल्पात मराठवाड्यासाठी भरीव तरतूद करण्याची मागणी करण्यात येत आहे. 

वंशाचा दिवा मुलगा नव्हे, मुलगी

पीटलाइन महत्त्वाची 

नवीन रेल्वे गाड्या सोडण्यासाठी रेल्वेच्या देखभाल दुरुस्तीसाठी पीटलाइन अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळेच औरंगाबाद येथे पीटलाइन करावी हा महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पीटलाइन नसल्याचे कारणे देत नवीन रेल्वे सुरू करण्याला कायम नकार घंटा आहे. त्यामुळेच औरंगाबादला पीटलाइन करण्याची गरज आहे. मॉडर्न औरंगाबाद रेल्वेस्थानकाच्या दुसऱ्या टप्प्याचे कामे रखडलेली आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या औरंगाबाद रेल्वेस्थानकाचे कामे पूर्णत्वाला नेणे आवश्‍यक आहेत. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात नांदेड नंतर सर्वाधिक महसूल देणारे औरंगाबाद रेल्वेस्थानक आहे. असे असतानाही विकासाच्या बाबतीत मात्र दुजाभाव केला जात आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News About Railway Aurangabad