esakal | औरंगाबाद ते मनमाड  विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा 
sakal

बोलून बातमी शोधा

photo

औरंगाबाद फर्स्टच्या शिष्टमंडळाला रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांची ग्वाही 

औरंगाबाद ते मनमाड  विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा 

sakal_logo
By
अनिल जमधडे

औरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली. 

औरंगाबाद फर्स्टच्या शिष्टमंडळासमवेत नवी दिल्ली येथे सोमवारी (ता. दोन) आयोजित बैठकीत बोलत होते. त्याचबरोबर रेल्वे अधिकाऱ्यांसोबतही बैठक पार पडली. या शिष्टमंडळात औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष मानसिंग पवार, माजी अध्यक्ष ऋषी बागला, उपाध्यक्ष रवींद्र कोंडेकर, कोषाध्यक्ष अनिल माळी, हेमंत लांडगे आणि सुनीत कोठारी उपस्थित होते. 

हे ही वाचा -   संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...  

काय म्हणाले रेल्वे मंत्री 

श्री. गोयल म्हणाले, ‘‘औरंगाबाद ते मनमाडदरम्यान असलेल्या रेल्वेमार्गावर विद्युतीकरणाची करण्याची नितांत आवश्यकता आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पार पडली असून, हे काम २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रेल्वे मंत्रालयाने ठेवले आहे. विद्युतीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच औरंगाबाद रेल्वेस्थानकावरून नव्या रेल्वे सुरू करता येणे शक्य आहे. नव्या रेल्वेने भारतातील महत्त्वाची शहरे जोडण्याचा आमचा मानस आहे. त्याचबरोबर औरंगाबादमध्ये पीटलाइन टाकण्यासाठी चाचपणी करून काम सुरू केले जाईल,’’ असे अश्वासन श्री. गोयल यांनी दिले. 

औरंगाबाद ते पुणे रेल्वेची शक्यता 

औरंगाबाद ते पुणे रेल्वे सुरू करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक आहे; मात्र ही दोन्ही शहरे रेल्वेने जोडण्याकरिता अर्धा खर्च राज्य सरकारने उचलण्याची आवश्यकता आहे, अर्धा खर्च निश्चितच केंद्र सरकार करेल. त्यामुळे राज्य सरकारने औरंगाबाद-पुणे रेल्वे सुरू होण्यासाठी एक पाऊल पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे मत श्री. गोयल यांनी व्यक्त केले. 

रेल्वेस्थानकाचा विकास पीपीपीद्वारे 

औरंगाबाद रेल्वेस्थानकाचा विकास करण्यासंदर्भात केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाशी बोलणी पूर्ण झालेली आहे. त्याशिवाय जागतिक दर्जाचे रेल्वेस्थानक तयार करण्यासाठी पीपीपी मॉडेलद्वारे विकसित करण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. प्रामुख्याने पायाभूत सुविधा उभारून व्यापारी संकुल उभारण्यासंदर्भात विचार केला जात आहे. या माध्यमातून मिळणारा पैसा हा औरंगाबादच्याच विकासासाठी वापरण्यात येईल, असेही ते म्हणाले. 

हे ही वाचा -   भाजपचे नगरसेवक आले काळे कपडे घालून आणि...   

अधिकाऱ्यांसमोर मांडला लेखाजोखा 

केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना भेटण्यापूर्वी औरंगाबाद फर्स्टच्या शिष्टमंडळाने रेल्वे मंत्रालयातील प्रमुख अधिकाऱ्यांना भेट देऊन औरंगाबाद रेल्वेची सद्यःस्थिती, प्रस्तावित कामे आणि अपेक्षित कामांचा लेखाजोखा आकडेवारीसह सादर केला. शास्त्रशुद्ध पद्धतीने सादर केलेल्या या मागणीचे रेल्वे अधिकाऱ्यांनीही स्वागत केले. या अधिकाऱ्यांमध्ये रेल्वे मंत्रालयाचे कार्यकारी संचालक (नियोजन) व्ही. शंकर, कार्यकारी संचालक (बोगी) विनय श्रीवास्तव, कार्यकारी संचालक (पायाभूत सुविधा) आर. के. सिंग, संचालक (रेल्वेब्रीज) सुबोधकुमार, कार्यकारी संचालक (नवीन रेल्वे) मनदीपसिंग भाटिया, कार्यकारी संचालक (प्रकल्प संचलन) बी. के. गुप्ता, कार्यकारी संचालक (सर्वेक्षण) बी. एस. बोध यांचा समावेश होता. 

हे ही वाचा - मार्चमध्ये बँका राहणार आठ दिवस बंद, वाचा कोणते...  
 

अशा आहेत मागण्या 

-औरंगाबाद ते मनमाडदरम्यान रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण आणि दुहेरीकरण करणे. 
-औरंगाबादमध्ये पीटलाइनची उभारणी करणे. 
-औरंगाबादहून रेल्वेद्वारे महत्त्वाची शहरे जोडण्यासाठी नव्या रेल्वे सुरू करणे. 
-औरंगाबादहून नवीन रेल्वेमार्ग उभारणे. 
-पश्चिम महाराष्ट्र, कोकण, देशभरातील प्रमुख धार्मिक व तीर्थक्षेत्र रेल्वेने जोडणे. 
-उस्मानाबाद, बीड, शिर्डी, बुलडाणा, नगर आणि अजिंठा मार्ग जोडणे. 
- हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारणे. 
-औरंगाबाद रेल्वेस्थानकाचा विकास करणे. 
-कोकण रेल्वेच्या धर्तीवर मराठवाडा रेल्वे महामंडळाची स्थापना करणे. 
 

go to top