पुढचे तीन दिवस ‘बामू’ बंद, कुलगुरुंचे आदेश

अतुल पाटील
रविवार, 22 मार्च 2020

आदेश २५ मार्चपर्यंत आपत्कालीन परिस्थिती म्हणुन लागू केले आहेत. शिक्षकांनी २५ मार्चपर्यंत घरी बसून काम करण्याचे निर्देश दिलेले आहेत. या संदर्भात २५ मार्च रोजी आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, हा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. असे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांनी कळविले आहे.

औरंगाबाद : कोरोना विषाणू संदर्भात उपायोजना करण्यासाठी देशभर प्रयत्न होत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ २५ मार्चपर्यंत संपुर्णतः बंद ठेवण्याचे आदेश कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी दिले आहेत. या काळात सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी मुख्यालय न सोडता घरी बसूनच आवश्यक ती प्रशासकीय काम करावीत, असे निर्देश आहेत.

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागातर्फे रविवारी (ता .२२) दुपारी प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. यानूसार, डॉ. येवले यांनी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन येत्या २५ मार्चपर्यंत विद्यापीठ परिसर पुर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे, असे घोषित केले आहे. याकाळात विद्यापीठाच्या औरंगाबाद मुख्य परिसर येथील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभाग पुर्णतः बंद राहतील. तसेच विद्यापीठाचा उस्मानाबाद उपपरिसर व मॉडेल कॉलेज, घनसावंगी हेही या काळात पुर्णतः बंद राहील.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

कोरोना विषाणुचा (कोव्हीड-१९) प्रादुर्भाव विद्यापीठ परिसर, वसतिगृहे, कार्यालयामध्ये होऊ नये तसेच अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांना त्याचा संसर्ग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक व तातडीची उपाययोजना म्हणून सदरचे निर्देश दिले गेले आहेत. सदरील आदेश वैद्यकीय विभाग, तातडीची सेवा देणारा विभाग, सुरक्षा विभाग, इत्यादींच्या विभागप्रमुखांना ज्यांची सेवा अत्यावश्यक वाटत असल्यास त्याबाबतीत त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा.

आदेश २५ मार्चपर्यंत आपत्कालीन परिस्थिती म्हणुन लागू केले आहेत. शिक्षकांनी २५ मार्चपर्यंत घरी बसून काम करण्याचे निर्देश दिलेले आहेत. या संदर्भात २५ मार्च रोजी आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, हा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. असे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांनी कळविले आहे.

सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख यांनी आपल्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांच्या सदर परिपत्रक निदर्शनास आणून द्यावे, तसेच सर्व संबधितांनी याची नोंद घेऊन काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. तसेच २५ मार्चपर्यंत विद्यापीठ परिसर बंद राहील याची नोंद सर्व संलग्नित महाविद्यालये, विद्यार्थी व सर्व संबधितांनी घ्यावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात १४४ कलम लावण्यात आले आहे. पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास बंदी आहे . सदर आदेशाची अंमलबजावणी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात तात्काळ करण्याचे आदेश मा कुलगुरू यांनी प्रशासन व सुरक्षा विभागाला दिले आहेत. येत्या ३१ मार्चपर्यंत विद्यापीठ परिसरात कोणीही अनावश्यक गर्दी करू नये, असेही विद्यापीठ प्रशासनाने कळविले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Next Three Days BAMU Closed Aurangabad News