
या आदेशाने रात्री ११ वाजेनंतर पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही रस्त्यावर, गल्लोगल्ली संचार, वाहतूक, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे या सर्व कृत्यास पूर्णपणे बंदी राहणार आहे.
औरंगाबाद : कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने वाढत्या संक्रमणाला रोखण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी मंगळवारपासून (ता.२३) पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. ही संचारबंदी आठ मार्चपर्यंत रात्री ११ ते सकाळी सहा वाजेपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाने रात्री ११ वाजेनंतर पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही रस्त्यावर, गल्लोगल्ली संचार, वाहतूक, फिरणे, उभे राहणे, थांबून राहणे, रेंगाळणे या सर्व कृत्यास पूर्णपणे बंदी राहणार आहे.
पोलिस, आरोग्य, वीज, पाणीपुरवठा, दूरसंचार, दळणवळण आदी अत्यावश्यक वस्तू व सेवा यांची वाहतूक, कोरोनाचा संसर्ग व प्रसार टाळण्यासाठी कार्यरत संबंधित आपत्ती निवारण व्यवस्थापनातील अधिकारी व कर्मचारी, तसेच जिल्हा प्रशासन, महापालिका व पोलिस आयुक्तालयाच्या वतीने परवानगी दिलेल्या व्यक्ती यांना हा आदेश लागू नसेल. मात्र, त्यासाठी त्यांनी त्यांचे ओळखपत्र व या विशेष कार्यासाठी नेमणुकीबाबतचे आदेश सोबत बाळगणे बंधनकारक असेल. त्याचप्रमाणे नमूद मुभा असलेल्या सर्व व्यक्तींना त्यांचे ओळखपत्र अथवा आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड आदी सोबत बाळगणे बंधनकारक असल्याचेही पोलिस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी या आदेशात म्हटले आहे.
वाचा - मित्राच्या लग्नाची चालली होती वरात, गाणं होतं झिंगाट; पण कठड्याने केला घात
पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार...
० पाचपेक्षा जास्त नागरिक एका ठिकाणी जमा होऊ शकणार नाहीत.
० अत्यावश्यक बाबी वगळता ये-जा करण्यास, फिरायला पूर्णपणे बंदी.
० हॉस्पिटल, क्लिनिक, मेडिकल शॉप्स या सर्व प्रकारच्या आरोग्य सेवांसह
औद्योगिक कारखाने चालू राहतील. कामगार व माल वाहतूक सुरू राहील.
० पेट्रोलपंप सुरू राहतील. अत्यावश्यक सेवा-सुविधा सुरू राहतील.
० माल व मालवाहतूक या संबंधाने चढण व उतरण सेवा यांना परवानगी असेल.
० कॉल सेंटरची कार्यालये, टॅक्सी, कार, ऑटो, ट्रान्स्पोर्ट बस यांना परवानगी.
Edited - Ganesh Pitekar