पावणेदहा लाखांच्या वायरचे २० बंडलची चोरी, वाळूज औद्योगिक वसाहतीमधील घटना

रामराव भराड
Sunday, 25 October 2020

रात्रीच्या वेळी कंपनी बंद असताना खिडकी तोडून आतील नऊ लाख ८१ हजार ७१५ रुपये किंमतीचे कॉपर वायरचे २० बंडल्स अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.

वाळूज (जि.औरंगाबाद)  : रात्रीच्या वेळी कंपनी बंद असताना खिडकी तोडून आतील नऊ लाख ८१ हजार ७१५ रुपये किंमतीचे कॉपर वायरचे २० बंडल्स अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. वाळूज औद्योगिक वसाहतीत घडलेली ही चोरीची घटना गुरुवारी (ता.१५) रोजी सकाळी उघडकीस आली. गेल्या आठ दिवसापासून अज्ञात चोरट्यांनी वाळूज औद्योगिक वसाहतीत चोरीचा सपाटा सुरू केला असून पोलीस मात्र याबाबत हतबल असल्याचे दिसून येते.

फुलंब्री तालूक्यात गर्भवतीचा विहिरीत पडून मृत्यू 

वाळूज औद्योगिक वसाहतीतील एच ४४ मधील दिग्विजय इंडस्ट्रीज या कंपनीत इलेक्ट्रीसिटीचे ट्रांसफार्मर तयार करण्यात येते. यासाठी लागणारा कच्चामाल परराज्यातून येतो. तो आल्यानंतर कंपनीच्यावतीने फ्लॉवर आणि स्टोअर रूममध्ये ठेवला जातो. कंपनी फक्त दिवस पाळीत चालत असल्याने रात्री बंद असते. बुधवारी (ता.१४) रोजी रात्री नऊ वाजता कंपनी बंद केल्यानंतर सर्वजण घरी गेले होते.

गुरुवारी (ता.१५) रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास प्लॅन्ट चार्ज कंपनीसाठी लागणारा कच्चामाल कॉपर वायर घेण्यासाठी स्टोअर रूममध्ये गेला असता येथे ठेवलेला कच्चामाल अस्ताव्यस्त पडलेला व कमी झालेला दिसून आला. कंपनीतील कच्चामाल चोरीस गेल्याचे लक्षात आल्यामुळे कंपनीचे लेखा अधिकारी विजयकुमार जैन यांनी कंपनीचे मालक श्रीराम शिंदे यांना बोलावून मालाची मोजणी केली असता नऊ लाख ८१ हजार ७१५ रुपये किमतीचे कॉपर वायरचे २० बंडल चोरीस गेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी विजयकुमार श्रीपाल जैन यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दसऱ्याच्या निमित्ताने बाजारपेठेत खरेदीसाठी नवचैतन्य, पाचशे वाहनांची बुकिंग, ७० वाहनांची डिलव्हरी

चोरट्यांपुढे पोलीस हतबल
वाळूज औद्योगिक वसाहत परिसरात चोरट्यांनी हैदोस घातला आहे. त्यामुळे परिसरातील व्यापारी, उद्योजक व नागरिक त्रस्त झाले आहे. सणासुदीच्या दिवसात चोऱ्यांचे सत्र वाढत आहे. यातील चोरटे पोलिसांच्या हातावर तुरी देत आहे. एकीकडे लाखमोलाचा ऐवज चोरीला जात असून पोलीस मात्र या चोरट्यांपुढे हतबल झाल्याचे दिसून येते.

उद्योजक, पोलीस बैठक निष्फळ
वाळूज औद्योगिक वसाहतीतील वाढत्या चोऱ्या व अन्य प्रश्नासंदर्भात वाळूज एमआयडीसी पोलीस व उद्योजक यांच्यात नुकतीच बैठक झाली. यावेळी ठाणे प्रमुखांनी औद्योगिक वसाहतीतील चोऱ्या रोखण्यासाठी अनेक सूचना करत चोरीला आळा बसेल. असे आश्वासन दिले होते. मात्र ही बैठक निष्फळ झाल्याचे वाढत्या चोरीच्या प्रमाणावरून दिसून येते.
 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine Lakh Seventy Five Thousand Rupees Wire Bundals Stolen Waluj MIDC