esakal | चालकाचा ताबा सुटल्याने वाहन पलटी, औरंगाबादला परतणारे १९ मजूर जखमी 
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

भरधाव वेगात जाणाऱ्या टाटा मॅजिक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन पलटी झाल्याने वाहनातील एकूण १९ जण जखमी झाल्याची घटना कचनेर-करमाड मार्गावर आज सोमवारी (ता.२६) रात्री साडेसातच्या सुमारास जोडवाडी (ता.औरंगाबाद) शिवारात घडली.

चालकाचा ताबा सुटल्याने वाहन पलटी, औरंगाबादला परतणारे १९ मजूर जखमी 

sakal_logo
By
शेख मुनाफ

आडूळ (जि.औरंगाबाद)  : भरधाव वेगात जाणाऱ्या टाटा मॅजिक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन पलटी झाल्याने वाहनातील एकूण १९ जण जखमी झाल्याची घटना कचनेर-करमाड मार्गावर आज सोमवारी (ता.२६) रात्री साडेसातच्या सुमारास जोडवाडी (ता.औरंगाबाद) शिवारात घडली. या भीषण अपघातात तीन जण गंभीर, तर १६ जण किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमी औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

पंकजा मुंडे, जानकर यांच्यावर गुन्हा दाखल; दसरा मेळाव्याला गर्दी जमवून आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका


सध्या शाळेला सुट्ट्या असल्याने जयभवानी नगर, मुकुंदवाडी (औरंगाबाद) भागातील विद्यार्थी व काही मजूर आज बालानगर शिवारात रोजंदारीने कपाशी वेचण्यासाठी कचनेरमार्गे टाटा मॅजिक वाहनाने (एमएच २१ बीएफ ३३९७ ) आज सकाळी गेले होते. दिवसभर कापूस वेचून झाल्यावर परत आपल्या घराकडे रात्री सदरील वाहनामधून जात असताना जोडवाडी शिवारात सदरील वाहन चालकाचे वेगाने जाणाऱ्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने जोरदार खाली खोल शेतामध्ये वाहन आदळून पलटी झाल्याने वाहनातील रमेश कापुरे (वय ३०), सचिन कापुरे (२७), राधाबाई गवळी (५०), सुखदेव महादु शेळके (५६) , गीता इंगळे (३०), वैष्णवी आघाव (१४), अलका मुरलीधर जाधव (३७), शिला मुरलीधर जाधव (१०), सुरत इंगळे, सखुबाई, आशा राठोड, पुष्पा सुलाने, स्वामिनी काळे, अनिता खांडेभराड, मीराबाई खांडेभराड, गयाबाई सदाफुले, सागर सदाफुले, मोहन राऊत ( सर्व रा जयभवानी नगर मुकुंदवाडी) असे एकूण १९ जण जखमी झाले आहेत.

अपघात घडल्याचा जोराचा आवाज ग्रामस्थांच्या कानी पडताच संजय डोभाळ, सजन बहुरे, संतोष बहुरे, अजय कवाळे आदींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांच्या मदतीने गंभीर जखमी झालेल्यांना वाहनाच्या बाहेर काढले व याची माहिती १०८ या रुग्णवाहिकेला कळविली. त्यानंतर ताबडतोब डॉ.संदीप गुंडरे,चालक शेख रईस, नासेर पठाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व जखमींना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी प्रवाशांनी व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेची नोंद चिकलठाणा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहे.

संपादन - गणेश पिटेकर