औरंगाबादेत मोफत अंत्यविधीचे पुन्हा वांधे, स्मशानजोगींचे थकले पैसे

माधव इतबारे
Thursday, 24 December 2020

औरंगाबाद महापालिकेने ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मोफत अंत्यसंस्कार योजना’ सुरू केली आहे.

औरंगाबाद : मोफत अंत्यविधीचे पुन्हा एकदा वांधे झाले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून स्मशानजोगींचे पैसे थकीत असून, वारंवार पाठपुरावा करूनही थकीत रक्कम मिळत नसल्याने गुरुवारपासून (ता.२४) सर्व स्मशान भूमीमध्ये मोफत अंत्यविधी बंद केला जाईल, असा इशारा स्मशानजोगींनी बुधवारी (ता.२३) दिला आहे. महापालिकेने ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मोफत अंत्यसंस्कार योजना’ सुरू केली आहे. कोरोना काळातही या योजनेअंतर्गत रुग्णांवर बचतगटाच्यावतीने मोफत अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, योजनेचे पैसे वारंवार थकत असल्यामुळे स्मशानजोगी आर्थिक अडचणीत येत आहेत.

 

 

मोफत अंत्यसंस्कार केल्यानंतर त्या पावत्या लेखा विभागात जमा केल्या जातात. त्यानुसार संबंधित स्मशानजोगीच्या बॅंक खात्यावर रक्कम जमा होते. मात्र स्मशानजोगींनी गेल्या सहा महिन्यापासून जमा केलेल्या पावत्यांचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे स्मशानजोगींनी बुधवारी महापालिकेत धाव घेत आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. थकीत रक्कम मिळावी म्हणून वारंवार मागणी केली मात्र अद्याप, रक्कम मिळालेली नाही. अशा परिस्थितीतही मोफत अंत्यविधी करण्याचे काम थांबविले नाही.

 

 

आता लाकडे आणण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत. कंत्राटदारांचे पैसे थकीत असल्याने त्यांनी आम्हांला लाकडे देणे बंद केले आहे. सहा महिन्याची थकीत रक्कम देण्यात यावी, अन्यथा गुरुवारपासून मोफत अंत्यविधीची पावती स्वीकारली जाणार नाही, अशा इशारा देण्यात आला आहे. गोविंद गायकवाड, गंगाधर पवार, अनिल गायकवाड, लक्ष्मण शेळके, एल्लपा शेळके, साहेबराव पवार, रामचंद्र पवार, लक्ष्मण गायकवाड यांची उपस्थिती होती.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Free Final Ritual, Cremation Associates Not Get Payment Aurangabad News