
राज्य शासनाने महापालिका क्षेत्रात रात्री ११ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी (कर्फ्यू) लागू केली आहे. त्यामुळे शहरातील हॉटेल रात्री १०.३० पूर्वी बंद झाले नाहीत तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
औरंगाबाद : राज्य शासनाने महापालिका क्षेत्रात रात्री ११ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी (कर्फ्यू) लागू केली आहे. त्यामुळे शहरातील हॉटेल रात्री १०.३० पूर्वी बंद झाले नाहीत तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. ग्रामीण भागातही पाच जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी असेल, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंगळवारी (ता. २२) जाहीर केले.
पत्रकार परिषदेत श्री. चव्हाण म्हणाले, की ब्रिटनमध्ये कोरोना वाढल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे रात्री १०.३० नंतर शहरात जे हॉटेल, आस्थापना, दुकाने सुरू राहतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. शहराप्रमाणेच ग्रामीण पोलीस हद्दीतही संचारबंदी राहणार असल्याने ढाबे, हॉटेल्स यावर देखील प्रशासनाची नजर असेल. झालर क्षेत्र आणि ग्रामीण हद्दीतील ढाबे, हॉटेल्स या संचारबंदीच्या काळात बंद असतील.
कलम १४४ कलमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कुणावरही कारवाई करण्याची वेळ येऊ, अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पोलीस आयुक्त निखील गुप्ता म्हणाले, की रात्रीची संचारबंदी १५ दिवसांसाठी आहे. याकाळात म्हणजेच रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे. नियम पाळण्याची जबाबदारी सर्वांची आहे.
हे राहणार सुरू
रात्रीच्या संचारबंदीच्या काळात आरोग्य सेवा, मेडिकल दुकाने, रात्रपाळीतील उद्योग, मजूर, हमाल, अत्यावश्यक सेवा, पेट्रोल पंप, कॉल सेंटर, दळणवळण, दूरसंचार, पाणीपुरवठा यंत्रणा, बस, खासगी बस सुरू राहणार आहेत. तसेच या काळात उद्योग, जीवनावश्यक वस्तुंची माल वाहतूक सुरू राहील, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
ओळखपत्र आवश्यक
संचारबंदी कालावधीत रात्री बाहेर पडणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी, कारखान्यातील कर्मचारी, आवश्यक आस्थापनांवरील अधिकारी, कर्मचारी, मजूर यांना संचारबंदी काळात सूट देण्यात येत आहे. मात्र, संबंधितांना ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. त्याऐवजी वाहन परवाना, आधार कार्ड, पॅन कार्ड आदी ओळखपत्रही सोबत बाळगण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
Edited - Ganesh Pitekar