`सेल्फ स्टडी’च्या जोरावर नुरुल हसन झाले ‘आयपीएस’

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 April 2020

पदवीचे शिक्षण घेऊन कुटुंबाला आधार देण्यासाठी मिळेल त्या नोकरीला प्राधान्य दिले. आठ तास नोकरी करून मिळालेला पगार कुटुंबाला दिला. क्‍लासेस लावण्याची परिस्थिती नसल्याने ध्येय गाठण्यासाठी सेल्फ स्टडी करून आयपीएस परीक्षा पास झाल्याचे नुरुल हसन यांनी सांगितले. सुरवातीला माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात परिविक्षाधीन सहायक पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. जिवतोड मेहनत केल्यास ध्येय गाठण्यासाठी कधीच गरिबी आडवी येत नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

औरंगाबाद - सरायपूर (जि. पिलीभीत, उत्तर प्रदेश) या छोट्याशा गावातील सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या नुरुल हसन यांचे वडील न्यायालयात लिपिक होते. एकट्याच्या पगारावर पाच सदस्यांच्या कुटुंबाचा गाडा हाकावा लागत असल्याने घरची आर्थिक परिस्थितीही बेताचीच होती. गावातच प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर नुरुल हसन यांनी इंजिनिअरची पदवी घेतली. कुटुंबाला आधार देण्यासाठी मिळेल ती नोकरी करणे भाग होते. त्यामुळे त्यांनी आधी नोकरीला प्राधान्य दिले. 

हेही वाचा - कोरोना बरा होतो; मग एड्सपेक्षा धोकादायक का? 

क्लास लावायलाही नव्हते पैसे 
यावेळी त्यांना मुंबई येथे सिमेन्स कंपनीत नोकरी मिळाली. त्यानंतर ते भाभा अणुसंशोधन केंद्रात नोकरीला लागले. महिन्याकाठी मिळत असलेला पगार घरी द्यावा लागत असल्याने जेमतेम पैसेच जवळ राहायचे. यामुळे आय.ए.एस., आय.पी.एस. होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी क्‍लासेस लावायला पैसे जमा राहत नव्हते. यामुळे नुरुल हसन यांनी ध्येय गाठण्यासाठी आठ तास नोकरी करून सेल्फ स्टडी करायला सुरवात केली. रात्री आठ तास अभ्यास करून सकाळी ड्युटी करायची, असा त्यांचा दिनक्रम सुरू झाला. मेहनतीला जिद्दीची जोड मिळाली. अशा परिस्थितीत यू.पी.एस.सी.च्या पहिल्या परीक्षेत मुलाखतीला अपयश आले; परंतु अपयशाने खचून न जाता त्यांनी २०१४ मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत यश मिळविले. यानंतर आयपीएस म्हणून त्यांना महाराष्ट्रात पोस्टिंग मिळाली. माजलगावात (जि. बीड) परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी पहिला पदभार घेतला. 

हो खरंच - धक्कादायक! ५०० पटींनी वाढले आंबटशौकीन, महाराष्ट्र मात्र सभ्य

अवैध धंद्यांवर उगारला बडगा 
सहायक पोलिस अधीक्षक म्हणून रुजू होताच नुरुल हसन यांनी अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई करून आळा घातला. अवैध धंदे, वाहतूक, दारूविक्रीविरुद्ध मोहीम उघडून कारवाया सुरू केल्या. त्यानंतर जिथे जिथे पोस्टिंग मिळाली, तिथेही त्यांनी अशा कारवाया केल्या आहेत. नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्याला प्राधान्य असल्याचे नुरुल हसन यांनी सांगितले. 

नुरूल हसन यांचा करिअर मंत्र 

  • विद्यार्थ्यांनी अगोदर ध्येय निश्‍चित करून त्या दिशेने वाटचाल करावी. 
  • कठोर परिश्रम घेऊन एकाग्रतेने अभ्यास केल्यास यश निश्‍चित मिळेल. 
  • स्पर्धा परीक्षेत जात, धर्माला कधीच थारा मिळत नाही 
  • तिथे फक्त गुणवत्तेवरच यश मिळते. यशाशिवाय काहीही नाही. 
  • गरिबी आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा कठोर मेहनत करा. 
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nurul Hasan becomes 'IPS' on the basis of self-study