
नातवाच्या मृत्यूची माहिती कळताच आजोबांना हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना देवताळा (ता.औसा) येथे घडली.
बेलकुंड (जि.लातूर) : नातवाच्या मृत्यूची माहिती कळताच आजोबांना हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना देवताळा (ता.औसा) येथे घडली. हरिबा चव्हाण असे मृत्यू झालेल्या आजोबांचे नाव आहे. कर्तव्य बजावून दुचाकीने घरी परतणाऱ्या देवताळा येथील पोलिस अंमलदार सतीश शिवाजी चव्हाण (वय ३१) यांच्या दुचाकीला मुंबई - नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील इंडियन लॉजिस्टिक माणकोली, भिवंडी येथे वाहनाने जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.१९) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. त्यांच्या मूळगावी देवताळा येथे सोमवारी (ता.२१) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून पोलिस दलाच्या वतीने अखेरची मानवंदना देण्यात आली.
सतीश चव्हाण हे (ता.भिवंडी) ठाणे ग्रामीण पोलिस दलात अंमलदार पदावर कार्यरत होते. शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गावरील इंडियन लॉजिस्टिक माणकोली, भिवंडी येथे चव्हाण यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती देवताळा येथील आजोबा हरिबा चव्हाण यांना रविवारी कळताच त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. एका घरातील दोन व्यक्ती अचानक निघून जाण्याने देवताळामध्ये शोकाकुल वातावरण पसरले आहे.
आजोबांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर सोमवारी सतीश चव्हाण यांच्या पार्थिवावर पोलिस दलाच्या वतीने मानवंदना देत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई- वडील, दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव, माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामदास चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य शालिनीताई चव्हाण, सरपंच प्रदीप चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक संदीप भारती, बीटअंमलदार बापूसाहेब मंतलवाड, भिवंडी येथील पोलिस कर्मचारी राठोड, भांडे, भात, पाटील, पालवे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
संपादन - गणेश पिटेकर