रस्त्यांच्या १०० कोटींचा भार एमआयडीसी, एमएसआरडीसीवर

माधव इतबारे
Tuesday, 22 December 2020

राज्य शासनाने औरंगाबाद शहरातील रस्त्यांसाठी १५२ कोटींचा निधी मंजूर केला आहे.

औरंगाबाद : राज्य शासनाने शहरातील रस्त्यांसाठी १५२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यातील सुमारे १०० कोटींचा बोजा एमआयडीसी व एमएसआरडीसीवर टाकण्यात आला आहे. महापालिकेच्या वाट्याला ५० कोटी ५८ लाखांची नऊ कामे असून, यातील १५ कोटी चार लाख २३ हजार रुपये पहिल्या टप्प्यात वितरित करण्यात आले आहेत. शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी राज्य सरकारने जानेवारी महिन्यात १५२ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. ही कामे महापालिका, एमआयडीसी, एमएसआरडीसीला विभागून देण्यात आले आहेत.

 

 

मात्र निधी उपलब्धतेचे पत्र मिळाले नसल्याने महापालिकेचे काम सुरू झाले नव्हते. दरम्यान नगरविकास विभागाने १५२ कोटी ३८ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचे परिपत्रक काढले आहे. त्यात ५१.७६ कोटी रुपये महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळासाठी, ५०.०४ कोटी रुपये एमआयडीसीसाठी तर ५०.५८ कोटी रुपये महापालिकेसाठी राहतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. एमएसआरडीसी व एमआयडीसीला प्रत्येकी ५१.७६ कोटी रुपये आणि ५०.०४ कोटी रुपये तर नगरविकास विभागाकडून महापालिकेला ५०.५८ कोटी रुपये दिले जातील. महापालिकेला द्यावयाच्या ५०.५८ कोटी रुपयांपैकी पहिल्या टप्प्यात १५ कोटी चार लाख २३ हजार रुपये वितरित केले जात आहेत असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. म्हणजे १५२ कोटी ३८ लाखांपैकी नगरविकास विभागाने १५ कोटी ४ लाख २३ हजार रुपये उपलब्ध करून दिले आहेत.

 

 
 

ड्रेनेज, पाणी पुरवठ्याच्या कामांची काळजी घ्या
शहरात पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्यासह ड्रेनेज कामे प्रस्तावित असलेल्या रस्त्यांचे उत्खनन होणार नाही अशा प्रकारे कामाचे नियोजन करावे. पाणी पुरवठा व मलनिस्सारण प्रकल्पाची कामे पूर्ण झाल्यावर रस्त्यांची कामे करावीत, निधीचा अपव्यय होणार नाही, याची जबाबदारी संबंधितावर टाकण्यात आली आहे.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Hundred Crores Burden On MIDC, MSRDC Aurangabad News