क्लिक कराल तर बसेल गंडा : कोरोनासंबंधित अशा फसव्या लिंकपासून धोका

मनोज साखरे
Tuesday, 7 April 2020

जगात कोरोनाचे मोठे संकट उभे आहे. लॉकडाऊनचा काळ आहे. जो तो घरात असून चिंतित आहे. कोरोनाचे भय दाखवून बाधित रुग्णांपासून दूर जाण्यासाठीच्या फसव्या लिंक पाठवून, कॉल करून गंडविण्याचा प्रयत्न भामटे करीत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

औरंगाबाद : जगात कोरोनाचे मोठे संकट उभे आहे. लॉकडाऊनचा काळ आहे. जो तो घरात असून चिंतित आहे. कोरोनाचे भय दाखवून बाधित रुग्णांपासून दूर जाण्यासाठीच्या फसव्या लिंक पाठवून, कॉल करून गंडविण्याचा प्रयत्न भामटे करीत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे कुठलीही लिंक अथवा कॉल आल्यास त्याला थारा देऊ नका. फसव्या लिंकवर क्लिक केले तर आर्थिक फटका बसू शकतो. यासाठी नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. 

भामट्यांचे हे आहेत फंडे 

 1. प्रधानमंत्री बेरोजगार योजनेच्या नावाखाली दहावी पास व नोकरी नसणाऱ्यांना साडेतीन हजार रुपये मिळतील असे आमिष : (http://bit.ly/pradhanmantrI-berojgar-bhatta-yojnaa) लिंकद्वारे दाखवले जाते. 
 2. लॉकडाऊन कालावधीत दोन महिन्यांकरिता फ्री नेटफ्लिक्सबाबतचे आमिष दाखवून (https://bit.ly/2JsBZ1O) हि लिंक आपणास पाठवली जाते, ती फसवी असते. 
 3. जिओ कंपनीतर्फे भारतातील सर्व नागरिकांना ४९८ रुपयांचे फ्री रिचार्ज आमिष दाखवून (https://jiorechargenew.online) या लिंकद्वारे फसवणूक केली जाते. 
 4. आरोग्य मंत्रालयातर्फे कोरोना व्हायरसदरम्यान घरी राहण्यासाठी साठ जीबीचे इंटरनेट मोफत दिले जाईल असे आमिष दाखवून (https://corona-gov.in?60gb) या लिंकद्वारे फसवणूक केली जाते. 
 5. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला २५ हजार रुपयांचे आमिष दाखवून (http://pmyojna.ssctechnical.com) या लिंकद्वारे फसवणूक केली जाते. 

देशातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रत्येक जण कोरोनामुळे चिंतित आहे. व्हॉट्सॲप व इतर सोशल मीडियाद्वारे आपण कोरोनाबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. हल्ली भामट्यांसाठी कोरोना हा नवीन ट्रेंड्स असल्याने ते बाधित रुग्णांपासून दूर जाण्यासाठीच्या भंपक क्लृप्त्या काढत आहेत. असे ॲप निघाल्याचे सांगत लिंकही पाठवीत आहेत. यात कोरोनाबाधित रुग्ण आपल्या आसपास असेल तर आपला मोबाईल व्हायब्रेट होईल. 

त्यामुळे आपण तेथून दूर जाऊ शकू, अशी थाप मारली जात आहे. पण असे ॲप फसवे आहेत. अशाच पद्धतीचे नानाविध फंडे वापरून भामटे लॉकडाऊनच्या काळात गंडविण्याचे प्रयत्न करीत आहेत. हे व असे फसवे ॲप डाऊनलोड करताना आपणास खूप परमिशन्स मागितल्या जातात. त्यात तुम्हाला बँक खाते, डिटेल्स, पासवर्ड मागितला जातो. आपला मोबाईल डाटाही याद्वारे भामटे वापरू शकतात. 

  ही घ्या काळजी... 

  • अनोळखी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. 
  • अनोळखी लिंकसोबत असलेली फाइल डाऊनलोड करू नका. 
  • मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉपला चांगल्या प्रतीचा अँटीव्हायरस वापरावा.
  • महत्त्वाच्या फाइल्सचा बॅकअप घेऊन ठेवावा. 
  • कोणतेही अनोळखी ॲप्लिकेशन डाऊनलोड करू नका. 
  • कोणत्याही अनोळखी वेबपेजवर किंवा लिंकवर आपली वैयक्तिक माहिती देऊ नका. 
  • फसवणुकीचा संशय येत असेल तर आपण जवळच्या सायबर पोलिस स्टेशनशी संपर्क करा किंवा (www.reportphshing.in), (www.cybercrime.gov.in) यावर कळवा. 

  असे फसवे ॲप आधीही यायचे. नवीन ट्रेंडस्, नवीन वातावरण भेटले की भामटे अशा लिंक पसरवतात. आपले बँकिंग डिटेल्स मागच्या दाराने अर्थात फसवून मिळवू शकतात. ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी खात्री करा, शासनाच्या राष्ट्रीय वाहिन्यांवरून अथवा आकाशवाणीवरून ॲप्स आणि वेबसाईटबाबत सांगितले जाते. त्या गोष्टींवरच विश्वास ठेवा. कोणतेही ॲप, वेबसाईट शासकीय आहे किंवा नाही याची खात्री करा. त्यासाठी अबाऊट इन्फोमध्ये जा आणि माहिती घ्या. रिव्ह्यू वाचा, ॲप किंवा वेबसाईट खरी की खोटी हे त्यावरून समजते. कोणतेही ॲप डाऊनलोड करताना परमिशन्स जास्त प्रमाणात मागत असल्यास सावध राहा; कारण शासकीय ॲप जास्त परमिशन्स मागत नाहीत. 
  - राहुल खटावकर, सहायक निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे


  स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  Web Title: Online Cyber Fraud In Coronavirus Lockdown Crime News