जिओ डिलरशिपच्या आमिषाने सव्वा कोटीचा गंडा, आर्थिक गुन्हे शाखेने चौघांना ठोकल्या बेड्या

सुषेन जाधव
Saturday, 9 January 2021

जिओ कंपनीची विविध ठिकाणी डिलरशिप देण्याच्या आमिषाने चौघांनी बनावट कागदपत्राआधारे अनामत रक्कम म्हणून रोखीने व्यापाऱ्याकडून तब्बल एक कोटी रुपये उकळत गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

औरंगाबाद : जिओ कंपनीची विविध ठिकाणी डिलरशिप देण्याच्या आमिषाने चौघांनी बनावट कागदपत्राआधारे अनामत रक्कम म्हणून रोखीने व्यापाऱ्याकडून तब्बल एक कोटी रुपये उकळत गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २५ डिसेंबर २०१८ ते ७ जून २०१९ या काळात किराडपुरा भागातील रहेमानिया कॉलनीत घडला. यात आर्थिक गुन्हे शाखेने चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांच्या मारहाणीला कंटाळून शेतकऱ्याने केली आत्महत्या, उमरगा तालुक्यातील धक्कादायक घटना

शेख इर्शाद शेख फारूख (२६, रा. हिदायतनगर, कमळापूर रोड, वाळूज), मोहसीन खान गुलाब खान पठाण (३०, रा. बजरंग चौक, एन-७, सिडको), तौसिफ खान युसूफ खान (२३, रा. रशीदपुरा) आणि शेख मोहम्मद आमेर मोहम्मद नईमुल्ला (२२, रा. गल्ली क्र. ३, रहेमानिया कॉलनी) या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर सय्यद अकबर (रा. जिन्सी) हा फरार आहे.
मुबारक बिन हबीब अलजावरी (३८, रा. रहेमानिया कॉलनी, किराडपुरा) यांचे १७ वर्षांपासून एन-चार भागात वाहन दुरुस्तीचे गॅरेज आहे. मावसभाऊ अमर बिन कबीर बातोक याच्या ओळखीतून मुबारक हे जिओ ईन्फोकॉम कंपनीत नोकरीला असलेल्या शेख इर्शादच्या संपर्कात आले.

गारखेडा परिसरातील रिलायन्स मॉलमध्ये कामाला असताना इर्शादने त्यांना सिडको, कॅनॉट प्लेसमधील जिओ कंपनीची डिलरशिप निघणार आहे. या कंपनीची डिलरशिप हवी असेल तर सांगा असे म्हणत इर्शादने त्यांना जाळ्यात ओढले. ऑगस्ट-२०१८ मध्ये अमर बातोक व त्याच्या मित्रांनी पुन्हा इर्शादकडे जिओ कंपनीच्या डिलरशिपबाबत बोलण्यास सांगितले. त्यानंतर नोव्हेंबर-२०१८ मध्ये इर्शादने मुबारक यांच्या मोबाइलवर संपर्क साधून त्यांना कॅनॉट प्लेसमध्ये जिओ कंपनीची डिलरशिप निघाली आहे.

महाराष्ट्र बँकेला चुना, ७१ शेतकऱ्यांनी केली एक कोटी नऊ लाखांची फसवणूक

त्यासाठी तुम्ही सकाळी घरी या असे सांगितले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुबारक यांनी इर्शादचे घर गाठले. तेव्हा त्याने डिलरशिपसाठी ४० लाख रुपये कंपनीकडे सुरक्षा ठेव म्हणून जमा करावे लागतील असे सांगितले. मुबारक यांनी कुटुंबीयांशी चर्चा झाल्यानंतर डिलरशिप घेण्याचे ठरले. डिसेंबर-२०१८ मध्ये याच आठवड्यात पैसे जमा करावे लागतील नसता डिलरशिप मिळणार नाही असे सांगितले.

‘जिओ’चे बनावट अधिकारी केले उभे
मुबारक यांनी २५ डिसेंबर २०१८ रोजी रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे कार्यालय गाठले. या कार्यालयात गेल्यावर तेथे उभ्या असलेल्या चौघांनी सर्व जिओ कंपनीचे अधिकारी आहेत. असे सांगत त्यांनी पुण्याच्या मुख्य कार्यालयाचे उमेश दुबे, नीलेश अत्रे आणि मंगेश देशमुख यांनी कंपनीचे व्यवस्थापक शेख नदिम यांची ओळख करून दिली. यावेळी इर्शाद, दुबे, अत्रे, देशमुख आणि नदीम यांनी डिलरशिपसंदर्भात माहिती दिली. त्यामुळे मुबारक यांचा विश्वास बसला.

इन्कमटॅक्सच्या भीतीने पैसे उकळण्यास सुरुवात
मुबारक यांना पाचही जणांनी इन्कमटॅक्सची भीती दाखवत ४० लाख रुपयांची अनामत रक्कम रोखीने जमा करा सांगितले. मुबारक यांनी मित्र व नातेवाइकांकडून जमा केलेले दहा-दहा लाख रुपये इर्शादला दिले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी डिलरशिप संबंधातील करारनाम्याचे पत्र मुबारक यांना देण्यात आले. यावर मुबारक यांची देखील स्वाक्षरी घेण्यात आली. पुढे २८ डिसेंबर २०१८ रोजी मुबारक यांनी इर्शादला ११ लाख रुपये दिले. ३१ लाख रुपये मिळाल्यानंतर मुबारक यांना डिलरशिपसाठी ३७ लाख रुपये कंपनीकडे सुरक्षा ठेव म्हणून जमा करावी लागेल असे सांगण्यात आले.

औरंगाबादसह इतरत्रही आमिष
औरंगाबादसह जालना जिल्ह्यासाठी देखील योजना असल्याचे सांगितल्याने मुबारक यांनी सासरे व इतर नातेवाइकांना माहिती दिली. त्यानुसार, मुबारक यांनी टप्प्याटप्प्याने कॅनॉट प्लेस, सिडको, औरंगाबाद जिल्हा, जालना जिल्हा व छावणी विभागाच्या डिलरशिपसाठी एकूण एक कोटी १० लाख रुपये इर्शाद व पुण्यातील अधिकाऱ्यांकडे जमा केले. डिलरशिपसाठी खोटे व बनावट कागदपत्र दिल्याचे निदर्शनास आल्यावर मुबारक यांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधून तक्रार दिली.

त्यांची केवळ होती नावे
डिलरशिप मिळत नसल्यामुळे मुबारक यांनी जिओचे पुण्यातील कार्यालय गाठले. तेव्हा अत्रे, दुबे आणि देशमुख नावाचे कोणतेही अधिकारी तेथे नसल्याचे समोर आले. त्यावरून गुरुवारी आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी शोध घेत चौघांच्या सायंकाळी मुसक्या आवळल्या. संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले असता आरोपींना १२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच. एस. पुराडउपाध्ये यांनी दिले.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Over Name Of Geo Dealership Above One Crores Cheating Aurangabad Crime News