'रस्ता नाही तर मतदान नाही'; थेरगावातील शेकडो नागरिकांचा मतदानावर बहिष्कार

हबीबखान पठाण
Tuesday, 12 January 2021

यासंबधी तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे.

पाचोड (जि.औरंगाबाद):  स्वातंत्र्यानंतर 75 वर्षानंतरही तांडे, वाडया, शेतवस्त्यावर दळणवळणासाठी पक्के रस्ते न पोहचल्याने बारमाही विद्यार्थांसह वस्तीवरील नागरिकांना रस्त्यासाठी जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे. या लोकांच्या हाकेला कुणीच प्रतिसाद देत नसल्याने शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी थेरगाव (ता. पैठण) येथील गाडे व उबाळे वस्तीवरील ग्रामस्थांनी शुक्रवारी (ता. 15) होणाऱ्या ग्रामपंचायतच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबधी तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे.

थेरगाव गावातील काही कुटुंबीय गावांपासून दोन किलोमीटर अंतरावर वस्ती करून राहतात. येथील दीडशेच्या जवळपास शाळकरी मुले तर उर्वरित महिला- पुरुष शाळा व विविध गरजांसाठी गावात ये-जा करतात. पक्का रस्ता नसल्याने पावसाळ्याच्या चार महिन्यानंतरही हा रस्ता पाणंद रस्ता असल्याने व यंदा परतीच्या पावसाने सर्वत्र नदी-नाल्यांना आला होता. यामुळे अद्यापही काही भागांत पाणी वाहण्यासोबतच सर्वत्र दलदलीची स्थिती आहे.

RBI चा राज्यातील आणखी एका बँकेला दणका! परवाना रद्द केल्याने ठेवीदारांमध्ये खळबळ

यामुळे शेतवस्तीवरील सर्वाना वाहत्या पाण्यातून आणि चिखलातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. शाळेसह दैनंदिन गरजा पुर्ण करण्यासाठी गावांत येण्याशिवाय अन्य पर्याय नसल्याने जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे.

10 वर्षांपूर्वी तत्कालीन शासनाने गाव तेथे एस.टी. अन् वस्ती व शेत तेथे शिव व पाणंद रस्ते योजना कार्यान्वित करून रस्ते अभियान राज्यभर राबविले, मात्र या योजना गरजूपर्यंत पोहचल्याचं दिसत नाही. त्यामूळे कित्येक शेतात वास्तव्य करुन राहणाऱ्या नागरिकांसह त्यांच्या पाल्यांना शिक्षणासह विविध गरजा भागविण्यासाठी गावात येताना अनेक संकटाचा सामना करत गाव गाठावे लागते. यांत सर्वाधिक त्रास शेतवस्तीवरील विद्यार्थ्याना होतो. याचे जिवंत उदाहरण थेरगाव व कडेठाण तांडा येथे पाहावयास मिळते.

थेरगाव येथील गाडे - कोल्हे व उबाळे कुटुंबीय अनेक वर्षांपासून शेतात वास्तव्य करून राहतात. गाव व वस्तीच्या मध्यभागी मोठी नदी असून त्या वस्तीपर्यंत कच्चा रस्ता आहे. अनेकदा या वस्तीवरील नागरिकांनी पक्क्या रस्त्याची मागणी करूनही त्यांची मागणी कोणी फारशी गांभीर्याने घेतली नाही. मात्र गतवर्षी समाजसेवक डॉ धोंडीराम पुजारी यांनी स्वखर्चातुन जेसीबीद्वारे रस्ता तयार करुन दिला. पंरतु या वस्तीवरील नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद पावसाळा सुरु होताच हिरावला गेला.

मराठवाड्याच्या आणखी बातम्या वाचा

एकंदरीत वैतागलेल्या नागरिकांनी ''रस्ता नाही तर मतदान नाही" असा निश्चय केला असून ग्रामपंचायत निवडणूकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा कटाक्षाने निर्णय घेतला असून सदरील आशयाचे निवेदन प्रशासनास दिले आहे.

यासंबधी बापुराव गाडेकर, शिवाजी उबाळे, विष्णु गाडेकर म्हणाले,' निवडणुक आली की सर्व राजकीय पदाधिकारी आमचे वस्तीवर येतात, आश्वासने देतात व एकदा निवडणूक संपली की कुणी आमचेकडे डोकावूनही पाहत नाही. त्यांना केवळ मतांसाठी आमची आठवण येते, मात्र आता 'रस्ता नाही...  तर मत नाही', असा आम्ही निर्णय घेतला आहे. आमचे वस्तीवर 135 मतदार आहेत, परंतु आम्ही कुणीच रस्ता होईपर्यंत मतदान करणार नाही, शंभर टक्के बहिष्कार टाकणारच.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pachod aurangabad news gram panchayat election voters boycott on voting