विधान परिषदेसाठी मराठवाड्यातून भाजपतर्फे यांची दावेदारी

प्रकाश बनकर
बुधवार, 6 मे 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पद टिकविण्यासाठी आमदार होणे आवश्यक होते. मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने ठाकरे यांची अडचण झाली होती. अखेर विधान परिषदेच्या नऊ जागांची निवडणूक घेऊन ठाकरे यांचा मार्ग सुकर करण्याचा फॉर्म्युला समोर आला. 

औरंगाबाद : विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणुका होत आहेत. संख्याबळानुसार भाजपला चार जागा मिळण्याची शक्यता असून, विधान परिषदेवर आपल्याला संधी मिळवी यासाठी अनेकजण सध्या वरिष्ठ पातळीवर फिल्डिंग लावत आहे. मराठवाड्यातून पंकजा मुंडे, ज्ञानोबा मुंडे, अनिल मकरिये यांच्यासह इतर नेते इच्छुक आहेत. यात माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा दावा प्रबळ मानला जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पद टिकविण्यासाठी आमदार होणे आवश्यक होते. मात्र कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने ठाकरे यांची अडचण झाली होती. अखेर विधान परिषदेच्या नऊ जागांची निवडणूक घेऊन ठाकरे यांचा मार्ग सुकर करण्याचा फॉर्म्युला समोर आला. 

महत्त्वाची बातमी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या

विधान परिषदेच्या नऊपैकी चार जागा मिळतील, एवढे भाजपचे संख्याबळ आहे. यातील तीन जागेवर निवडणूक बिनविरोध होईल, असेही बोलले जात आहे. त्यामुळे अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. आपली वर्णी लागावी यासाठी वरिष्ठ पातळीवर वशिले लावण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. भाजपच्या वाट्याच्या चार जागांसाठी पंकजा मुंडे, माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री विनोद तावडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री रणजितसिंह मोहिते पाटील या दिग्गजांचे नाव चर्चेत आहे. 

मराठवाड्यातून पंकजा मुंडे यांच्यासह भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष भाई ज्ञानोबा मुंडे, लातूरचे जिल्हाध्यक्ष रमेश कराड, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मकरिये, लातूरचे माजी जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे यांचे नाव इच्छुकांमध्ये येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

परभणीतून फोन आला आणि औरंगाबादेत घडले काय...  

दरम्यान भाजपने औरंगाबादेतून डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेवर संधी दिली आहे. तसेच नांदेडला देखील विधानपरिषदेची जागा मिळाली आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांना आता संधी देणार की नाही, हे कोर कमिटी ठरवणार असल्याचे भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

परळीला मिळणार तिसरा आमदार

परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे आमदार आहेत. काही महिन्‍यांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने त्यांच्या कोट्यातून संजय दौंड यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. आता पंकजा मुंडे यांना भाजपतर्फे आमदारकी मिळाली, तर परळीला तीन आमदार होतील. मात्र भाजप पक्ष तिकीट कोणाला देतो, यावरच पुढील भवितव्य अवलंबून राहणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pankajaa Munde Has Chances To Be Appointed As MLC Maharashtra