esakal | जैन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शुल्काविरोधात पालक आक्रमक, शाळेच्या मुख्याध्यापकांना घातला घेराव
sakal

बोलून बातमी शोधा

Jain International School

शाळेकडून घेतले जाणारे अवाजवी शुल्क, ते भरण्यासाठी पालकांवर दबाव टाकणे, शुल्क न भरल्यास ऑनलाइन चाचणीची लिंक न देणे असे प्रकार करणाऱ्या औरंगाबाद येथील जैन इंटरनॅशनल शाळेविरोधात मंगळवारी (ता. सहा) पालकांनी आक्रमक पवित्रा घेतला.

जैन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शुल्काविरोधात पालक आक्रमक, शाळेच्या मुख्याध्यापकांना घातला घेराव

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद : शाळेकडून घेतले जाणारे अवाजवी शुल्क, ते भरण्यासाठी पालकांवर दबाव टाकणे, शुल्क न भरल्यास ऑनलाइन चाचणीची लिंक न देणे असे प्रकार करणाऱ्या जैन इंटरनॅशनल शाळेविरोधात मंगळवारी (ता. सहा) पालकांनी आक्रमक पवित्रा घेतला. यात शाळेच्या मुख्याध्यापकांना घेराव घातला होता. सुमारे तीन तास शाळेत याबाबत गोंधळ सुरू होता.


कोरोना लॉकडाउनमुळे पालकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. अशा परिस्थितीत शाळेकडून पालकांना विद्यार्थ्यांचे संपूर्ण शुल्क भरण्यासाठी दबाव टाकला जात आहे. शुल्क न भरल्यास विद्यार्थ्यांना ऑनलाइन चाचणीची लिंक न देणे, पालकांवर दबाव टाकणे, अशी अडवणूक केली जात आहे. शाळा बंद असताना, विद्यार्थी शाळेत जात नसताना मार्च, एप्रिल, मेसह पूर्ण वर्षाचे शाळा शुल्क, बसभाडे, परीक्षा, भोजनाचे शुल्क पालकांना शाळेकडून मागितले जात आहे.

नवरात्रापूर्वी शहरात जम्बो कोरोना चाचणी मोहीम, औरंगाबाद महापालिकेची तयारी

आपल्या पाल्याचा दाखला काढून घ्या, अन्यथा आम्ही शाळेतून काढून टाकू, असा दमच जणू पालकांना दिला जातोय. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या भीतीपोटी काही पालकांनी शुल्क भरले आहे. मात्र, कोरोनामुळे ज्या पालकांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योग बंद पडले आहेत, अशा पालकांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. शाळेच्या मनमानीविरोधात शिक्षण विभागाकडून देखील ठोस असे पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे शाळांकडून दमदाटी सुरू असल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे.


ऑनलाइन शिक्षणासाठी शुल्क भरले नाही, म्हणून मुलाचे शिक्षण शाळेने बंद केले आहे; तसेच शाळेच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरून विद्यार्थ्याला मार्च ते मे महिन्याचे शुल्क भरण्यासाठी चक्क फर्स्ट वॉर्निंग, सेकंड वॉर्निंग सारख्या जाहीर सूचना दिल्या जात आहेत. आता शाळा व्यवस्थापनाकडून लास्ट वॉर्निंग देण्यात आली आहे. परिणामी विद्यार्थ्याने धसका घेतला असून त्याचे मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. त्यामुळे शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात कठोर कारवाई व्हावी.
- अशोक शिंदे, पालकशाळा बंद असल्यामुळे वाहतुकीचा, देखभालीचा, प्रयोगशाळेचा, जिमखान्याचा, भोजनाचा असे अनेक खर्च वाचले आहेत. मग असे असताना पालकांनी पूर्ण शुल्क का द्यायचे, शाळेचा ५० ते ६० टक्के खर्च हा इतर सुविधांचा असतो. या सर्वांचा विचार करून शाळांनी शुल्कामध्ये कपात करणे अपेक्षित आहे. सीबीएसईच्या नियमानुसार शाळेने शुल्क आकारावे.
- स्वप्नील चांदीवाल, पालक


शाळेकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जात नाही. शाळेला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे; तसेच शाळेकडून भोजन, स्कूलव्हॅनचा देखील खर्च घेतला जात नाही. नियमानुसार जे शुल्क होत आहे ते भरण्याचे आवाहन पालकांना केले आहे.
- संतोषकुमार, मुख्याध्यापक, जैन इंटरनॅशनल स्कूल
 

प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची नावे गेली कोठे? आरटीई प्रवेशाचा गोंधळ

संपादन - गणेश पिटेकर