
कोरोना संसर्गाची लाट असलेल्या चार राज्यातून शहरात येणाऱ्या प्रवाशांवर महापालिका प्रशासन लक्ष ठेवून आहे.
औरंगाबाद : कोरोना संसर्गाची लाट असलेल्या चार राज्यातून शहरात येणाऱ्या प्रवाशांवर महापालिका प्रशासन लक्ष ठेवून आहे. दिल्लीहून येणाऱ्या प्रवाशांची रेल्वेस्टेशन व विमानतळावर चाचणी केली जात आहे. सचखंड एक्सप्रेसमधून आलेले २२ प्रवासी आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आढळून आले तर विमानतळावर चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे शहरात येणाऱ्या प्रवाशांमार्फत कोरोना संसर्ग वाढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सचखंड एक्सप्रेसने शहरात दररोज दोनशे ते अडीचशे प्रवासी येतात. या प्रवाशांची रविवारपासून (ता. २२) ॲन्टीजेन व आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. सचखंडने एक्सप्रेसने आलेल्या प्रवाशांपैकी आत्तापर्यंत २२ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. विमानतळावर देखील चाचण्या केल्या जात आहेत. विमानाने आलेल्या प्रवाशांपैकी चार जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. रेल्वेस्टेशन, विमानतळ व्यतिरिक्त शहरात येणाऱ्या प्रवाशांची चाचणी केली जात नाही.
त्यामुळे प्रवाशांच्या माध्यमातून कोरोना धोका वाढण्याची भिती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान सचखंड एक्स्प्रेसने शुक्रवारी शहरात आलेल्या २१७ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यातून तीन जण पॉझिटिव्ह आढळून आले. विमानतळावर दिवसभरात ४९ विमान प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. गुरूवारी केलेल्या चाचण्यांतून दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
संपादन - गणेश पिटेकर