CoronaVirus : श्रमिक रेल्वेतील प्रवासी भुकेने व्याकूळ 

अनिलकुमार जमधडे
Monday, 25 May 2020

पुरेसे जेवण मिळेना, प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका 

औरंगाबाद : औरंगाबादहून शनिवारी (ता. २३) मुजफ्फरपूरला (बिहार) निघालेल्या रेल्वेतील मजूर अन्नपाण्यावाचून व्याकूळ झाले आहेत. अनेक स्थानकावर जेवण येतच नाही. ज्या ठिकाणी आले ते हातोहात संपून गेले, अशी आपबीती रेल्वेतील मजुरांच्या एका चमूने सांगितली आहे. 

औरंगाबादहून मराठवाड्यातील ठिकठिकाणी अडकून पडलेल्या मजुरांना घेऊन श्रमिक रेल्वे शनिवारी दुपारी बारा वाजता मुजफ्फरपूरला (बिहार) रवाना झाली आहे. या रेल्वेत औरंगाबादसह लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांतील १,३८७ कामगार, त्यांचे कुटुंबीय प्रवास करीत आहेत.

हेही वाचा : असे ओळखा नैसर्गिकरीत्या आणि कृत्रिमरीत्या पिकलेले आंबे

क्वारंटाइन शिक्का

लातूरवरून आलेले १३७ कामगार रेल्वेच्या दोन बोगीत बसले होते. यावेळी काहींच्या हातावर क्वारंटाइन शिक्का असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आले. ही बाब लक्षात येताच कामगारांना रेल्वेतून उतरविण्यात आले; परंतु या कामगारांकडे वैद्यकीय प्रमाणपत्र असून, चुकून शिक्का मारल्याचे लक्षात आले. या प्रकारनेही प्रवास सुरू होण्यापूर्वीच प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला होता. डॉक्टरांकडून चुकून क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात आला. या कामगारांकडे वैद्यकीय प्रमाणपत्र आहे. हे लक्षात आल्यानंतरच त्यांना प्रवासाची मुभा देण्यात आली होती.

 

हेही वाचा : हा ब्लॅक अॅण्ड व्हॉइट फोटो आपोआप होतो कलर, जाणून घ्या कारण...

 

जेवण मिळविण्यासाठी झुंबड 

आता मात्र प्रवासात या रेल्वेतील प्रवाशांना अन्न मिळत नसल्याने ते भुकेने व्याकूळ झाले आहेत. औरंगाबादहून रेल्वे निघाल्यानंतर भुसावळ येथे काही जणांना जेवण मिळाले. त्यानंतर पुन्हा जेवण आले नाही. इटारसी रेल्वेस्थानकावर आलेले जेवण पूर्ण प्रवाशांना मिळू शकले नाही, जेवण मिळविण्यासाठी झुंबड उडू लागली. प्रवासी अधिक आणि येणारे जेवण कमी त्यामुळे अनेक प्रवाशांना उपाशीपोटी प्रवास करावा लागत आहे. सोमवारी (ता. २५) सायंकाळपर्यंत ही रेल्वे मुजफ्फरपूरला पोचणार आहे. त्यामुळे आणखी मोठा प्रवास असल्याने पुन्हा जेवण मिळेल की नाही, या भीतीने मजूर हतबल झाले आहेत. रेल्वेतील मजुरांच्या संख्येप्रमाणे जेवण पुरविले पाहिजे, अशी अपेक्षा मजुरांनी व्यक्त केली आहे. 

हेही वाचा : पद्धतशीर दृष्टीकोन ठेऊन लाॅकडाऊन उठवु शकतो - उद्योजक सुनील किर्दक 

फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा 

रेल्वेमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला आहे. प्रवासी संख्या अधिक झाल्याने दोन प्रवाशातील योग्य अंतर पाळले जात नाही. अक्षरश जीव मुठीत घेऊन या प्रवाशांचा प्रवास सुरू आहे. कधी एकदाचा हा प्रवास संपेल अशी चिंता प्रवाशांना सतावत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Passengers on the labor train are starving