
पिस्तूल, जिवंत काडतूस विक्रीसाठी शहरात आलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली. यातील तिसऱ्या संशयिताला मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
औरंगाबाद : पिस्तूल, जिवंत काडतूस विक्रीसाठी शहरात आलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली. यातील तिसऱ्या संशयिताला मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून दोन पिस्तूलसह दोन जिवंत काडतूस, चार मोबाईल फोन, दोन दुचाकी असा तब्बल ३ लाख ४ हजार ४५० रुपयांचे साहित्य जप्त केले. ही कारवाई शनिवारी (ता. सात) रात्री उशिरा करण्यात आली. अभिजित मधुकर वाघमारे, (२२, बोरगाव तारू, ता. भोकरदन), बाळू खिल्लारे (२४, टाकळी गाव, ता. भोकरदन), कपिल रमेश जोगदंडे (रा. न्यायनगर गल्ली, औरंगाबाद) अशी संशयितांची नावे आहेत.
औरंगाबादेत दिवसभरात ६५ जणांना कोरोनाची लागण, जिल्ह्यात ६९५ रुग्णांवर उपचार सुरू
या प्रकरणी नियंत्रक कक्षाचे सहायक पोलिस निरीक्षक आर. बी. रोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिस्तूलसह जिवंत काडतूस विक्री करण्यासाठी हीनानगर येथे संशयित येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार श्री. रोडे यांनी पथकासह हीनानगर गाठले. दरम्यान, जालन्याकडून तिघे संशयित दोन दुचाकींवर जालन्याकडून औरंगाबादकडे येताना दिसले. ते समृद्धी फूट प्लाझाच्या मागच्या बाजूला हीनानगरच्या रस्त्यावर अंधारात थांबले. पोलिसांच्या पथकाने छापा टाकला असता दोघांना ताब्यात घेण्यात आले.
मात्र, तिसरा संशयित दुचाकीवर पळून गेला. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून प्रत्येकी ५२ हजार ४०० रुपयांच्या दोन पिस्तूल, ३८ हजार रुपयांचे चार मोबाईलसह पल्सर, दोन दुचाकी रोख रक्कम असे ३ लाख ४ हजार ४५० रुपयांचे साहित्य जप्त केला. त्यांना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई पोलिस अंमलदार राजेश बनकर, परशुराम सोनवणे, इम्रान पठाण, व्ही. आर. निकम, एम. बी. विखनकर, ए. आर. खरात, एस. जे. सय्यद, व्ही. एस. पवार, सिद्धार्थ थोरात, विशाल सोनवणे यांनी केली.
हेवे-दावे विसरा, पदवीधरचे काम करा; चंद्रकांत पाटील यांची भाजप कार्यकर्त्यांना सूचना
तिसऱ्याला पकडले पाठलाग करून
पोलिसांनी छापा मारताच जालन्याच्या दिशेने दुचाकीवर फरार झालेल्या तिसरा संशयित जोगदंडे याचा पोलिसांनी पाठलाग केला. जोगदंडे याने अचानक मार्ग बदलून तो शेंद्राच्या दिशेने गेला. पोलिसांचे पथक केंब्रिजमार्गे टोलनाक्याच्या दिशेने गेले. पोलिसांनी खासगी वाहनाने पाठलाग करीत त्याला टोलनाक्याजवळ थांबण्याचा इशारा केला असता त्याने अचानक दुचाकी थांबवून पळ काढला. पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला पकडले.
संपादन - गणेश पिटेकर