VIDEO : ऐकाच! आठवेल तुम्हाला प्रेयसी, मैत्रीण, जाल फ्लॅशबॅकमध्ये

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मे 2020

अनेकजण तर आपल्या सखे साजणीला कधी नव्हे ते नथ घातलेली पाहून ‘नथ नाकात राहू दे, नथ काढू नको गडे! तिच्या दर्शनावाचून, श्वास सरकेना पुढे’ अशी लाडिक मागणीही करीत आहेत. 

औरंगाबाद ः सध्या सोशल मीडियात नथीचा नखरा ट्रेंडमध्ये आहे. अनेक मुली, तरुणी, महिला या नथ घालून सेल्फी घेत व्हॉट्सअॅपला स्टेट्स, डीपी ठेवत आहेत. अनेकजणी तर आपल्या मैत्रिणीला नथ घालण्याचे चॅलेंज देत आहेत. त्यामुळे टिकटॉक, फेसबुक, हॅलो, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियावर नथ घातलेल्या तरुणी-महिला दिसत आहेत. एकूणच काय, तर सगळीकडे नथीच्या नखऱ्याची चर्चा आहे. त्याअनुषंगाने प्रसिद्ध कवी प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांच्या ‘सखे साजणी’ या दीर्घकवितेतील ‘नथ’ हे कडवेही चर्चेत आले आहे. अनेकजण तर आपल्या सखे साजणीला कधी नव्हे ते नथ घातलेली पाहून ‘नथ नाकात राहू दे, नथ काढू नको गडे! तिच्या दर्शनावाचून, श्वास सरकेना पुढे’ अशी लाडिक मागणीही करीत आहेत. 

 
कशी आली नथ ट्रेंडमध्ये
सोशल मीडियाने देशभरात सर्वांनाच वेड लावले आहे. सध्या सर्वांच्या हातात अँड्रॉईड फोन उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रत्येकजण सोशल मीडियावर कनेक्ट असतो. त्यात सध्या लॉकडाउनमुळे सर्वजण घरातच बसून आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर सुरवातीला चॅलेंज एक्सपेक्टेड, ट्रॅडिशनल, त्यानंतर अब मुस्कुरायेगा इंडिया तर आता सध्या नखरा नथीचा हे चॅलेंज एक्सेप्ट करून व्हॉट्सअॅप स्टेट्सवर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर हा वाढता ट्रेंड पाहावयास मिळत आहे.
 
हेही वाचा - अन् लाईव्हमध्येच एसपी कमिशनरला म्हणाल्या आय लव यू

 

कोण आहेत प्रा. ज्ञानेश वाकुडकर?
ज्ञानेश वाकुडकर हे मराठीतील आघाडीचे कवी आहेत. त्यांचे ‘सखे साजणी’, ‘अंगार आणि शृंगार’ हे काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. चित्रपट दिग्दर्शक म्हणूनही त्यांची ओळख असून, सध्या ते राजकारणात सक्रिय आहेत. ‘यमाच्या गावाला जाऊया’ या शेतकरी समस्याविषयक मराठी चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली. गायक, संगीतकार ‘गारवा’ फेम मिलिंद इंगळे यांनी वाकुडकरांच्या ‘सखे साजणी’ कवितासंग्रहावर ‘तुझ्या टपोर डोळ्यांत, माझं इवलंसं गाव!’ हा अल्बम काढला. या दीर्घ कवितासंग्रहात नथीवरही एक कविता आहे.

अशी आहे वाकुडकरांची ‘नथ’ 

तुझ्या नाकामध्ये नथ, नथ नाजूक अबोल
लाख बोलाहून सखे, तिच्या अबोल्याचं मोल!
नथ बैसली साजणी, किती मोक्याच्या ठिकाणी
इवलीशी नथ झाली, साऱ्या सौंदर्याची राणी!
तिचा इवलासा जीव, किती मानाला पोचली
जणू पानाच्या विड्याला, सखे लवंग टोचली!
अशी चकाकते नथ, फुटे प्रकाश पिसारा
तुझ्या नाकाच्या सेवेत, जणू आला शुक्रतारा!
तिचा वेगळा दरारा, तिचं वेगळंच काम
श्वास येता जाता तिला, सखे ठोकतो सलाम!
तिच्या दर्शनावाचून, श्वास सरकेना पुढे
नथ नाकात राहू दे, नथ काढू नको गडे!
एका एका श्वासामध्ये, तिचं मिसळलं नाव
तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poem by Dnyanesh Wakudkar On Nose Ring Nath