तिचे रक्षाबंधन ठरले शेवटचे, नवऱ्यासह सासरचे गेले बाराच्या भावात

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 9 August 2020

शेत घेण्यासाठी माहेरहून दीड लाख रुपये आण असा तगादा लावत विवाहितेचा शारिरीक, मानसिक छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीसह सासरा, सासु व दिराला करमाड पोलिसांनी शनिवारी (ता. आठ) सायंकाळी अटक केली.

औरंगाबाद: शेत घेण्यासाठी माहेरहून दीड लाख रुपये आण असा तगादा लावत विवाहितेचा शारिरीक, मानसिक छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीसह सासरा, सासु व दिराला करमाड पोलिसांनी शनिवारी (ता. आठ) सायंकाळी अटक केली.

पती लक्ष्मण भगवान शिंदे (२३), सासरा भगवान अंबर शिंदे (५२), सासु कालिंदा भगवान शिंदे (४८) दीर योगेश भगवान शिंदे (२५, सर्व रा. वाहेगाव देमणी, ता.जि. औरंगाबाद) अशी त्या संशयित आरोपींची नावे आहेत. 

हेही वाचा- दोघेजण घरात घुसले, विवाहितेला बेशुद्ध करुन बांधून ठेवले अन घर नेले धुवून 

मृत पुजा उर्फ दुर्गाचे वडील अनिल रामनाथ जऱ्हाड (४२, रा. चांगलेनगर, ता. अंबड, जि. जालना) यांनी तक्रार दिली. त्यानुसार, पुजा उर्फ दुर्गाचे लग्न मे २०१८ मध्ये लक्ष्मण शिंदे याच्याशी झाले होते. त्यावेळी त्यांनी पाच तोळे सोने, संसारोपयोगी साहित्य दिले होते. मात्र, लग्नात पुजाच्या सासरकडच्यांनी तीन लाख रुपये हुंड्याची मागणी केली.

जऱ्हाड यांची आर्थिक परिस्थिती एवढी रक्कम देण्याची नसल्याने त्यांनी ते दिले नाहीत. मे २०१९ मध्ये पुजाला मुलगी झाली. त्यानंतर सासरच्यांनी पुजाचा छळ सुरु केला. शेत घेण्यासाठी वडीलांकडुन तीन लाख रुपये आण असा तगादा लावत पिडितेला ते मारहाण करीत होते. चार महिन्यांपूर्वी जऱ्हाड यांनी भावाकडुन दीड लाख रुपये उसने घेतले व जावई लक्ष्मण शिंदे यांना ते धनादेशाव्दारे दिले. 

हेही वाचा- अल्पवयीन मुलीला पळवून नेले, गर्भवती केल्यानंतर न्यायालयात म्हणाला...

रक्षाबंधन ठरले शेवटचे 
पुजा ही रक्षा बंधनासाठी माहेरी आली होती. तेंव्हा तिने, सासरचे लोक शेती घेण्यासाठी तुझ्या वडिलांकडुन आणखी दीड लाख रुपये घेऊन ये म्हणत मारहाण करतात, पैसे दिले नाही तर तुला जीवंत मारुन टाकु, अशी धमकी देत असल्याचे वडील जऱ्हाड यांना सांगितले. ता. ७ ऑगस्ट रोजी पुजाने वाहेगाव येथे विषारी औषध प्राशन केले.

तीला उपचारासाठी घाटीत आणले असता तिचा मृत्यु झाला. हे रक्षाबंधन तिचे शेवटचेच ठरले. या प्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान रविवारी (ता. नऊ) वरील चारही संशयित आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. 

हेही वाचाः शेतकरी संतापले, नुकसानभरपाई मिळेलही; पण ते होऊ नये याची हमी कोण घेणार?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Custody To whole Family Aurangabad News