esakal | खरीप गेले, तर रब्बीची पेरणी लांबली; परतीच्या पावसाने मराठवाड्यात मोठे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

Soybean Damaged

परतीच्या पावसाने मराठवाड्याच्या विविध भागात मोठे नुकसान केले आहे. पण रब्बीची पेरणीही लांबणीवर पडली आहे.

खरीप गेले, तर रब्बीची पेरणी लांबली; परतीच्या पावसाने मराठवाड्यात मोठे नुकसान

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : परतीच्या पावसाने मराठवाड्याच्या विविध भागात मोठे नुकसान केले आहे. पण रब्बीची पेरणीही लांबणीवर पडली आहे.मराठवाड‌यात गेल्या शुक्रवारपासून औरंगाबादसह काही जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने मराठवाड्याला झोडपून काढले. अजूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. या पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. या पावसाने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले नगदी पीक हिरावून नेले. काढणी करून शेतातच ठेवलेली खरीप पिके पाण्यात गेली आहेत.

औरंगाबादच्या जैन इंटरनॅशनल स्कूलची मनसेकडून तोडफोड

हा परतीचा पाऊस की एखादे वादळ आहे याविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे भूगोल विभागप्रमुख तथा हवामानाचे अभ्यासक डॉ. मदन सूर्यवंशी म्हणाले, की बंगालच्या उपसागरात तयार झालेले हे वादळ अरबी समुद्रात स्थिरावेल. तामिळनाडू, कर्नाटक करत महाराष्ट्रात हे वादळ धडकले आहे. यात विशेषतः: मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद जिल्हे तर बीड जिल्ह्याचा काही भाग सर्वाधिक प्रभावित झाला आहे. हवामान खात्याने याला ईशान्य मान्सून वारेच म्हटले आहे. मात्र हे वादळ आहे. मराठवाड्यात आत्तापर्यंत वादळानेच पाऊस पडत आला आहे मात्र यावेळच्या वादळाने मराठवाड्याचे नुकसान केले आहे.

विभागीय आयुक्त केंद्रेकरांसमोर आत्मदहनाचा प्रयत्न, जाळून घेणाऱ्यास वाचविले


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वयक कृषी हवामान योजनेचे कृषी हवामानशास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी सांगितले, की साधारणतः ८ ते १२ ऑक्टोबरपर्यंत मान्सून संपून जातो. मात्र बंगालच्या सागरातून आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मान्सून लांबला. आणखी आठवडाभर अशीच स्थिती राहून या महिन्याच्या अखेरपर्यंत हळूहळू मान्सून कमी होईल. या पावसाने खरिपाचे नुकसान केले आहे. तर रब्बीच्या पेरणीवरही परिणाम होणार आहे. सोयाबीनची काढणी झाली की, रान मोकळे झाले आणि पाऊस परत गेला की रब्बीची पेरणी केली जाते मात्र आता सतत पाऊस सुरू असल्याने जमीन वापसास्थितीत नाही. पर्यायाने रब्बीच्या पेरणीला उशीर होणार असल्याचे डॉ. डाखोरे म्हणाले.

संपादन - गणेश पिटेकर