‘प्राण’ उपकरण ठरेल व्हेंटिलेटरला पर्याय!

राजाभाऊ मोगल
मंगळवार, 7 एप्रिल 2020

देशातील लाइफ सपोर्ट डिव्हाईसची कमतरता लक्षात घेऊन येथील ख्यातनाम उद्योजक राम भोगले यांच्या संकल्पनेतून ग्राइंडमास्टर कंपनीचे संचालक मिलिंद केळकर यांनी आपल्या कारखान्यात ब्रिदिंग असिस्टंट ‘प्राण’ हे उपकरण तयार केले आहे. प्राण हे स्वदेशी व्हेंटिलेटर असून अंबू बॅगची (बॅग व्हॉल्व्ह मास्क व्हेंटिलेटर) स्वयंचलित आवृत्ती आहे.

औरंगाबाद - देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना, विविध उद्योजक सकारात्मक भूमिका बजावण्यास पुढे येत आहेत. देशातील लाइफ सपोर्ट डिव्हाईसची कमतरता लक्षात घेऊन येथील ख्यातनाम उद्योजक राम भोगले यांच्या संकल्पनेतून ग्राइंडमास्टर कंपनीचे संचालक मिलिंद केळकर यांनी आपल्या कारखान्यात ब्रिदिंग असिस्टंट ‘प्राण’ हे उपकरण तयार केले आहे. 

हेही वाचा- धक्कादायक घाटीतील ब्रदरला कोरोनाची लागण

अंबू बॅगची स्वयंचलित आवृत्ती
प्राण हे स्वदेशी व्हेंटिलेटर असून अंबू बॅगची (बॅग व्हॉल्व्ह मास्क व्हेंटिलेटर) स्वयंचलित आवृत्ती आहे. या उपकरणाची किंमत ५० हजार रुपयांपेक्षा कमी असेल, असे त्यांनी सांगितले. हे ब्रिदिंग असिस्टंट जरी व्हेंटिलेटरसारखे अद्ययावत नसले तरी फक्त श्वसनाचा त्रास होणाऱ्या रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छवास देण्यासाठी हे उपकरण फायद्याचे ठरणार आहे. ग्रामीण भागात तज्ज्ञ व अद्ययावत वैद्यकीय सेवांचा अभाव असतो. तिथे हे उपकरण वापरण्यास सोपे आहे. पूर्वी रुग्णांना कृत्रिम श्वसन देण्यासाठी अंबू बॅगचा वापर केला जायचा. मात्र, ते हाताळण्यासाठी सहायकाची गरज लागत असे. कोरोना रुग्णांचे विलगीकरण करतात. तिथे सहायक किंवा कुटुंबातील व्यक्ती मदत करू शकत नाही. मात्र, या संकल्पनेत अंबू बॅगचा वापर करत स्वयंचलित उपकरण केल्याने रुग्णाला जेवढा प्राणवायू गरजेचा आहे, तशी सेटिंग केल्यास सहायकाची गरज भासणार नाही. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

कमतरता पूर्ण करेल
सध्या जगभरात व्हेंटिलेटरचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाची रूग्णसंख्या एकीकडे वाढत असतानाच दुसरीकडे मृत्यूचेही प्रमाण वाढलेले आहे. परिणामी व्हेंटीलेटरची मागणी अचानक वाढलेली आहे. तथापि, उद्योग बंद असल्याने तसेच अशा काळात एकाचवेळी हजारोंच्या संख्येने व्हेंटीलेटर तयार करणे सध्यातरी शक्य नाही.  या पार्श्वभूमीवर ‘प्राण’ ब्रिदिंग असिस्टंट नक्कीच वैद्यकीय उपकरणांची कमतरता पूर्ण करेल, असा विश्‍वासही श्री. भोगले यांनी व्यक्त केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Pran' device will be ventilator option!