
निवडणुकीसाठी भावनिक राजकारण खेळून वातावरण दूषित केले जात आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी पुण्यात आहे.
औरंगाबाद : पुण्याचे नाव बदलून ‘संभाजीनगर’ करा तसेच शनिवारवाड्याचे माँसाहेब जिजाऊ नामकरण करावे, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी बुधवारी (ता.१३) पत्रकार परिषदेत केली. या मागण्यांसाठी आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. आनंदराज आंबेडकर म्हणाले की, महापालिका निवडणूक आली की नामांतराचा वाद होतो. निवडणुकीसाठी भावनिक राजकारण खेळून वातावरण दूषित केले जात आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी पुण्यात आहे. त्यांचा अंत्यविधी पुण्यात झाला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचे उचित ठिकाण औरंगाबाद नसून पुणेच आहे.
औरंगाबादचे नाव हे औरंगाबादच राहावे, असे काहीही नाही. येथील लोकांना विश्वास घेऊन याबाबत निर्णय व्हावा, औरंगाबादचे आंतरराष्ट्रीय महत्त्व, पर्यटन उद्योग लक्षात घेत नावाबाबत विचार व्हायला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, राजकीय इच्छाशक्ती नसल्यानेच इंदू मिल येथील स्मारकाचे काम संथ गतीने सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला. तसेच शेतकरी आंदोलनासंदर्भातील प्रश्नावर बोलताना त्यांनी सरकारने हट्टीपणा दाखविला, असा आरोप करत तो दुर्दैवी असल्याचे सांगितले.
महापालिका लढणार
औरंगाबाद महापालिका निवडणुका सर्व ताकदीने लढणार आहोत. किती व कोणत्या जागांवर उमेदवार उभे करायचे याची पुढील रणनीती ठरविली जाईल. याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
संपादन - गणेश पिटेकर