हायटेक पुरोहित सांगणार श्रावणातील ऑनलाइन पूजा 

मधुकर कांबळे  
Friday, 24 July 2020

ऑनलाइन सर्व पूजा कर्मविधी होऊ शकतात. ऑनलाइन पूजेमुळे कोरोनाचे सर्वच नियम पाळले जाऊ शकतात. यजमान आणि गुरुजी दोघांचाही कोरोना संसर्गाचा धोका यामुळे टळतो.

औरंगाबाद : श्रावण हा व्रतवैकल्यांचा महिना. आधीच गेल्या मार्चपासून कोरोनाच्या लॉकडाउनमुळे पुरोहितवर्गाचे फार मोठे नुकसान झाले आहे. आता हा श्रावणही असाच जाऊ नये, तसेच यजमानांचीही गैरसोय टळावी, या हेतूने ऑनलाइन याज्ञिकी कर्म करण्याचा प्रकल्प पुरोहितांकडून सुरू करण्यात आला आहे. पुरोहितवर्गानेही बदलते तंत्रज्ञान स्वीकारल्याने युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलियामध्ये असलेल्या यजमानांचीही सोय झाली आहे. तथापि, यात नेटवर्कची थोडीफार अडचण येत असल्याचे सांगण्यात आले. 

श्रावणमास ते दिवाळीचे लक्ष्मीपूजन म्हणजे हिंदू धर्मातील प्रत्येक कुटुंबात सण, व्रतवैकल्ये, धार्मिक कार्यक्रम, धार्मिक कर्म प्रत्येकाच्या घरी होत असतात. यात श्रावणातील सत्यनारायण, मंगळागौर, लघुरुद्राभिषेक, महारुद्र तर त्यानंतर भाद्रपदातील गणेशमूर्ती स्थापना, श्री गणेश सहस्रावर्तन, ज्येष्ठा-कनिष्ठा गौरीपूजन, अनंत व्रताची उपासना व त्यानंतर लगेचच येणारा पितृपक्ष पंधरवडा. त्यात होणारे पितृकर्म श्राद्ध-पक्ष, भरणी श्राद्ध, तर्पण. पितृपक्ष संपताच येणारे घटस्थापना, नवरात्रीची दुर्गा उपासना, सप्तशतीचे पाठ, नवचंडी याग, महाअष्टमी होम, कुंकुमार्चन, दिवाळीतील लक्ष्मीपूजन असे अनेक प्रतिवार्षिक यजमानांच्या घरी होणारे कर्म प्रत्येक यजमानाचे पुरोहित हे यजमानांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन यजमानाकडून करवून घेत असतात. मात्र यंदा कोरोनामुळे यजमानांकडे गुरुजींना प्रत्यक्ष जाण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यावर या पुरोहितवर्गाने ऑनलाइनचा मार्ग शोधला आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

काय म्हणतात पुरोहित... 

अनिरुद्धशास्त्री पळसकर : यंदा कोरोनाच्या संकटामुळे यजमानांमध्ये संभ्रम आहे. गुरुजींना घरी बोलवायचे तर कसे करावे, त्यासाठी मार्गदर्शन म्हणून पुरोहित गुरुजींनी शहरातील यजमानांसाठी जिथे प्रत्यक्ष घरी जाण्याची परवानगी आहे, तिथे मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून स्वतःची व यजमानांचीही काळजी घ्यावी. प्रत्येक गुरुजी सर्वच पूजाकर्मे निश्चितपणे करतील. 

प्रवीण कुलकर्णी गुरुजी : शहर आणि परदेशातील यजमानांकडे पौरोहित्य करण्यासाठी पुरोहितांनीही नवे तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. जिथे प्रत्यक्ष जाणे शक्य होत नाही तिथे मग स्थानिक असो किंवा परदेशात राहणारे आमचे यजमान असो, त्यांचा पूजेचा नेम चुकणार नाही. ऑनलाइन पद्धतीने पूजा सांगितली जात आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा 

उद्धव जोशी गुरुजी : गुगल मीटद्वारे सर्व कर्मांसाठी जेवढे पुरोहित गुरुजी आवश्यक असतात, त्या सर्व गुरुजींना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ॲड करून यजमानांचे कर्म ऑनलाइन करून देण्याचा मार्गदर्शनाचा उपक्रम सुरू झालेला आहे. काळाच्या गरजेनुसार यजमानांची यातून सोय होईल. सर्वच यजमानांनी आपापल्या गुरुजींशी संपर्क करून याचा लाभ घ्यावा. 

स्वप्नील गुरू पैठणकर : ऑनलाइन पूजा केली तरी यजमानाला त्यांनी केलेल्या पूजेचे फळ प्रत्यक्ष पूजा केल्याप्रमाणेच मिळते. प्रत्यक्ष असो वा ऑनलाइन कर्म करताना यजमानांचे गुरुजी यजमानांच्या पूजेचा संकल्प करताना यजमानांचे गोत्र, नावाचा उच्चार करतात, म्हणजेच यजमान कितीही मैल दूर असला तरी त्यांना गुरुजींनी केलेल्या संकल्पाची निश्चितच फलप्राप्ती होते, यात शंकाच नाही, याला शास्रांचा आधारही आहे. 
 
स्वप्नील जोशी वानेगावकर : ऑनलाइन सर्व पूजा कर्मविधी होऊ शकतात. ऑनलाइन पूजेमुळे कोरोनाचे सर्वच नियम पाळले जाऊ शकतात. यजमान आणि गुरुजी दोघांचाही कोरोना संसर्गाचा धोका यामुळे टळतो. आॅनलाइन पूजा, कर्मविधी करताना गुरुजी प्रत्यक्ष बसल्याच्या धारणेने सर्व विधिवत कर्म करावेत. यातून निश्चितच गुरुजींना व यजमानालाही कर्मफलाची प्राप्ती होते. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Purohit Guruji Are Also Hitech In Shrawan Aurangabad News