राज ठाकरे यांचं औरंगाबादेत मोठं वक्तव्य

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 February 2020

मनसेच्या स्थापनेनंतर औरंगाबादेत त्यांनी पहिल्यांदाच रोड शो करत सेनेचा बालेकिल्ला असलेल्या गुलमंडीत धडक मारली. त्यानंतर शुक्रवारी (ता. १४) व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सकाळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी मनमोकळा संवाद साधला. 

औरंगाबाद : मनसेने झेंडा बदलला, तशी आपली भूमिकाही बदलली का याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. राज ठाकरे यांच्या मुंबईतील भाषणानंतर त्यावर शिक्कामोर्तब होत असतानाच, औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याच्या भूमिकेवरूनही वादंग उठला आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे औरंगाबादेत आले आहेत. यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 

बदललेल्या भुमिकेनंतर त्यांचा राज्यातील पहिलाच दौरा असल्याने मनसैनिकांनी औरंगाबादच्या महावीर चौकात गुरुवारी (ता. १३) त्यांचे जंगी स्वागत केले. मनसेच्या स्थापनेनंतर औरंगाबादेत त्यांनी पहिल्यांदाच रोड शो करत सेनेचा बालेकिल्ला असलेल्या गुलमंडीत धडक मारली. त्यानंतर शुक्रवारी (ता. १४) व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सकाळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी मनमोकळा संवाद साधला. 

राज ठाकरे अडकले, आणि मग... 

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आल्यामुळे त्यांना साहजिकच निवडणुकीशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले. त्यावर बोलताना त्यांनी आपण कुठलीही भूमिका बदलली नसल्याचे स्पष्ट केले. दिल्लीत केजरीवाल यांनी फक्त विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली, पण मनसेने विकासाच्या मुद्द्यांना काहीशी बगल देत हिंदुत्वाशी जवळीक केल्याचे दिसत आहे. त्यावर बोलताना दिल्ली वेगळी, महाराष्ट्र वेगळा आहे, असे राज ठाकरे म्हणाले. केवळ विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या तर काय होते, ते नाशिकच्या उदाहरणातून दिसलेच आहे.  

सो कॉल्ड हिंदुत्त्ववाद्यांनी काय केले... 

मी कुठलीही भूमिका बदललेली नाही. आजवर स्वतःला हिंदुत्त्ववादी म्हणवणाऱ्या लोकांनी पाकिस्तानी कलाकारांना देशाबाहेर हाकलण्याच्या फक्त वल्गना केल्या. पण त्यांनी असे काही केले का नाही? आजवर ते कुठे होते, असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. सो कॉल्ड हिंदुत्त्ववाद्यांनी आजवर काय केले हे विचारताना त्यांनी आपण स्पष्ट हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे का, यावर कोणतेही ठोस भाष्य केलेले नाही.

सेनेच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरे यांनी काय केले

यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, आमदार राजु पाटील, मनसे नेते अभिजीत पानसे, अनिल शिदोरे, जावेद शेख, संघटक वसंत फडके, सुधीर पाटसकर उपस्थित होते. त्याचबरोबर माजी आमदार हर्षवर्धन जाधव, सुहास दाशरथे, दिलीप बनकर या नव्याने आलेल्या शिलेदारांसह जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर, शहरअध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, संघटक बिपीन नाईक, वैभव मिटकर, उपाध्यक्ष गौतम आमराव, गजन गौडा पाटील, आशिष सुरडकर, भास्कर गाडेकर, संदीप कुलकर्णी यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारीही उपस्थित होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray In Aurangabad Breaking News