esakal | Success Story: नोकरी सोडली अन् झाले आयएएस, लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांचा प्रेरणादायी प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

Latur District Collector Prithviraj BP

मुंबईच्या आयआयटीमधून अभियांत्रिकी तर अहमदाबादच्या आयआयएममधून एमबीएची पदवी घेऊन तब्बल तीन वर्षे एका आयटी कंपनीत नोकरी केली. सध्या मिळणाऱ्या पगारापेक्षा चांगला होता.

Success Story: नोकरी सोडली अन् झाले आयएएस, लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांचा प्रेरणादायी प्रवास

sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर : मुंबईच्या आयआयटीमधून अभियांत्रिकी तर अहमदाबादच्या आयआयएममधून एमबीएची पदवी घेऊन तब्बल तीन वर्षे एका आयटी कंपनीत नोकरी केली. सध्या मिळणाऱ्या पगारापेक्षा चांगला होता. मात्र, त्यात समाधान मिळत नव्हते. सोबतचे अनेक मित्र प्रशासकीय सेवेत होते. त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली आणि चार वर्षांच्या प्रयत्नानंतर भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) निवड झाली, असा प्रवास नूतन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी शनिवारी (ता.१४) पत्रकारांना सांगितला.

पृथ्वीराज हे त्यांचे स्वतःचे नाव असून, बद्रीप्रसाद अर्थात बी. पी. हे त्यांच्या वडिलांचे नाव आहे. नावासमोर आडनाव लावत नसल्याचे सांगून पृथ्वीराज बी. पी. अशी ते स्वतःची ओळख सांगतात. पृथ्वीराज हे राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील ते मूळ रहिवासी आहेत. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गुजरातमध्ये झाले. २००४ मध्ये त्यांनी मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून (आयआयटी) अभियांत्रिकीची पदवी (बीटेक) तर २००६ मध्ये त्यांनी अहमदाबादच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून (एमआयएम) एमबीए पदवी मिळवली.

त्यानंतर एका आयटी कंपनीत ते मोठ्या पगाराचे पॅकेज घेऊन नोकरी करू लागले. तब्बल तीन वर्षे त्यांनी ही नोकरी केली. मात्र, नोकरी आणि नोकरीच्या कामात समाधान मिळत नव्हते. कुटुंबांतील बहुतांश सदस्य सरकारी नोकरीत आहेत. त्यांच्यामुळे व प्रशासकीय सेवेतील मित्रांकडून प्रेरणा मिळाली. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. सुरवातीला समाजशास्त्र व लोकप्रशासन हे ऐच्छिक विषय घेऊन परीक्षा दिली. २०११ मध्ये परीक्षेत उत्तीर्ण होऊन भारतीय रेल्वे वाहतूक सेवेत निवड झाली.

ही नोकरी करीत भारतीय प्रशासकीय सेवेसाठी (आयएएस) प्रयत्न सुरू ठेवले. २०१४ मध्ये आयएएसमध्ये निवड झाली. सोलापूर येथे परिविक्षाधीन कालावधी तर भंडारा येथे आदिवासी विकास प्रकल्पात काम केल्यानंतर २०१८ मध्ये परभणी येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. तिथे ३४ महिने काम केल्यानंतर गुरूवारी (ता. दहा) लातूरला जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्याचे श्री. पृथ्वीराज यांनी सांगितले.

समन्वयाला पहिले प्राधान्य
विविध सरकारी विभागाचे कामकाज प्रभावी समन्वयातून पार पडले तर शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी होते. यामुळेच मी जिल्ह्यात विविध विभागातील समन्वयाला पहिले प्राधान्य देणार आहे. त्यानंतर जिल्ह्याची गरज पाहता पाणीटंचाई निवारणाचा विषयही ऐरणीवर ठेवणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना आरोग्य व शिक्षण हे माझे आवडते विषय होते. जिल्हाधिकारी म्हणून काम करतानाही या विषयासाठी माझे योगदान राहणार आहे. आरोग्य व शिक्षणासाठी लागणाऱ्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर माझा भर राहणार असल्याचे पृथ्वीराज यांनी सांगितले.

संपादन - गणेश  पिटेकर

loading image