संतापजनक : कारागृहातील तरुण कैद्यासोबत अनैसर्गिक कृत्य

राजेभाऊ मोगल
Sunday, 17 May 2020

 नागनाथ सोनटक्के याला एका गुन्ह्यात शिक्षा झाली असून, तो हर्सूल कारागृहात शिक्षा भोगत आहे. सोनटक्के याच्या बॅरेकमध्ये बीड येथील २३ वर्षीय पीडित कैदी शिक्षा भोगत आहे.

औरंगाबाद : हर्सूल मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने त्याच्या बॅरेकमधील एका २३ वर्षीय कैद्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. हा प्रकार २३ ते २५ एप्रिलच्या दरम्यान कारागृहातील बॅरेक क्रमांक सहा येथे घडला. नागनाथ बापूराव सोनटक्के (रा. हर्सूल मध्यवर्ती कारागृह) असे अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या कैद्याचे नाव आहे. 

नागनाथ सोनटक्के याला एका गुन्ह्यात शिक्षा झाली असून, तो हर्सूल कारागृहात शिक्षा भोगत आहे. सोनटक्के याच्या बॅरेकमध्ये बीड येथील २३ वर्षीय पीडित कैदी शिक्षा भोगत आहे. २३ एप्रिलला पीडित कैदी मध्यरात्रीच्या सुमारास लघुशंका करण्यासाठी उठला होता. त्यावेळी सोनटक्के याने तुला बॅरेक बदलून देतो, असे आमिष दाखवून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर सोनटक्के याने आणखी तीन ते चार वेळा पीडित कैद्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. या किळसवाण्याप्रकरणी पीडित कैद्याच्या तक्रारीवरून नागनाथ सोनटक्के याच्याविरूद्ध हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन कामे करीत आहेत. 

धक्कादायक : औरंगाबादेत एकाच वाड्यात तब्बल ६७ कोरोनाबाधित
 
चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला मारहाण 
मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या ३४ वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास जुना मोंढा परिसरातील तक्षशीलनगर येथे घडली. अजगर खान याकूब खान (४०, रा.तक्षशीलनगर) याने शुक्रवारी दुपारी पत्नीला तुझे दुसऱ्या पुरूषासोबत अनैतिक संबंध आहेत, म्हणत तिच्या चारित्र्यावर संशय
घेत शिवीगाळ करीत लोखंडी सळईने बेदम मारहाण केली. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून अजगर खान याच्याविरूध्द जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास जमादार नजन करीत आहेत. 
 

असे ओळखा नैसर्गिकरीत्या आणि कृत्रिमरीत्या पिकलेले आंबे

मोबाईल न दिल्याच्या कारणावरून मारहाण 
मोबाईल न दिल्याच्या कारणावरून शेख सोफियान शेख अब्दुल रऊफ (१५, रा. यासीनगर, हर्सुल) याला एकाने शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. ही घटना १४ मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास हर्सुल परिसरातील यासीननगर भागात घडली. याप्रकरणी रूहान अब्दुल रहेमान (रा.यासीननगर, हर्सूल) याच्याविरूध्द हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक फौजदार बाबर करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rape on Male Prisoner in Hersul Jail Aurangabad