नोकरभरती करा... मराठा तरुण मोफत शासनसेवेस तयार!

राजेभाऊ मोगल
गुरुवार, 7 मे 2020

भरती प्रक्रिया थांबविल्यामुळे शेकडो तरुणांची शासकीय सेवेत नोकरी करण्याची संधी हुकणार आहे. लाखो तरुण नोकरीच्या आशेने दिवसरात्र अभ्यास करून स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. त्यामुळे जोपर्यंत राज्याची आर्थिक स्थिती सुधारत नाही तोपर्यंत मराठा समाजातील हजारो तरुण मोफत काम करण्यास तयार असल्याचे पत्र आर. आर. पाटील फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनोद पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

औरंगाबाद - शासनाने त्वरित नोकरभरती सुरू करावी, जोपर्यंत राज्याची आर्थिक स्थिती सुधारत नाही तोपर्यंत मराठा समाजातील शेकडो तरुण मोफत काम करण्यास तयार असल्याचे पत्र आर. आर. पाटील फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनोद पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. 

तरुणांची अवस्था लक्षात घ्या 
कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य शासनाने तत्काळ भरती प्रक्रिया थांबवली आहे. भरती प्रक्रिया थांबविल्यामुळे शेकडो तरुणांची शासकीय सेवेत नोकरी करण्याची संधी हुकणार आहे. लाखो तरुण नोकरीच्या आशेने दिवसरात्र अभ्यास करून स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. त्यासाठी कित्येकांनी पुणे-मुंबई गाठलेली आहे. काहीजण तर दिल्लीला गेलेले आहेत. बहुतेक तरुणांचे आई-वडील शेतकरी आहेत. पोटाला चिमटा देऊन ते आपल्या मुलांना पैसे पाठवितात. आता नोकरभरतीच बंद केल्याने हे तरुण आणि त्यांच्या आई-वडिलांना धक्काच बसलेला आहे. आता करायचे काय, अशा द्विधा मनःस्थितीत हे तरुण आहेत. 

हेही वाचा- विधानपरिषदेसाठी मराठवाड्यातून भाजपतर्फे यांची उमेदवारी

पिढीच बरबाद होण्याचा धोका 
नुकतीच एमपीएससीची तोंडी परीक्षा झाली आहे; परंतु कर्मचारी नसल्यामुळे तोंडी परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही. शासनाने नोकरभरतीची प्रक्रिया थांबवली तर मोठा गोंधळ निर्माण होऊन शेकडो तरुणांची एक पिढीच बरबाद होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. भरतीतून शासनाचे दोन उद्देश साध्य होतील. अडचणीच्या काळात बेरोजगार तरुणांना आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक नसेल तरी मानसिक आधार देता येईल आणि शासन सेवेतील रिक्त पदेही भरता येतील आणि प्रशासनाची खोळंबलेली कामेही मार्गी लागतील. शक्य असेल तर त्यांना रोजी-रोटीपुरते मानधन द्यावे. तेही शक्य नसेल तर जोपर्यंत राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत मराठा समाजातील तरुण शासन सेवेत मोफत काम करण्यास तयार असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, नोकरभरती करणे शक्य नसेल तर राज्य सरकारने आजची तारीख केंद्रस्थानी धरून पुढील भरती प्रक्रियेपर्यंत वयाची अट शिथिल करावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. 

संशयित आरोपीच कोरोनाग्रस्त, औरंगाबादेत ३० पोलिस क्वारंटाईन

इकडे आड, तिकडे विहीर 
नुकतेच मराठा समाजाला आरक्षण लागू झाले. त्यामुळे लाखो तरुण आनंदात होते. त्यात सुरवातीला नव्या शासनाने नोकरभरतीसाठी प्रयत्नही सुरू केले होते. आता कोरोनामुळे भरती बंदचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या तरुणांच्या आनंदावर विरजण पडले आहे. ‘एज बार’ होऊ घातलेल्या मराठा समाजातील तरुणांची अवस्था तर ‘इकडे आड अन् तिकडे विहीर’ अशी झालेली आहे. शासन याचा गांभीर्याने विचार करेल, अशी अपेक्षाही श्री. पाटील यांनी पत्रात व्यक्त केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Recruit ... Maratha youth ready for free government service!