कोविड रुग्णालयासाठी महापालिका भरणार एवढी पदे...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 June 2020

२५० बेडचे हे हॉस्पिटल महापालिकेला हस्तांतरित केले जाणार असून, महापालिका प्रशासनाने त्यासाठी सुमारे १४० पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. १३ एमडी डॉक्टरांसह वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, टेक्निशियन अशा पदांची भरती केली जाणार आहे. 

औरंगाबाद : चिकलठाणा एमआयडीसी भागात उभारण्यात आलेल्या कोविड-१९ रुग्णालयाचे शुक्रवारी (ता. १२) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. २५० बेडचे हे हॉस्पिटल महापालिकेला हस्तांतरित केले जाणार असून, महापालिका प्रशासनाने त्यासाठी सुमारे १४० पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. १३ एमडी डॉक्टरांसह वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, टेक्निशियन अशा पदांची भरती केली जाणार आहे. 

शहरात महापालिकेचे मोठे रुग्णालय नसल्याने कोविड-१९ रुग्णांचा सर्वाधिक भार घाटी रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयावर पडला होता. दरम्यान, महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपात काही ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करून रुग्णांचा भार उचलला. रुग्णालय सुरू करण्यासाठी महापालिकेला शासनातर्फे निधी मिळावा, अशी मागणी माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली होती.

औरंगाबादेत दोन कोरोनाबाधित कैदी पळाले, कोविड सेंटरमधून केला पोबारा 

त्यांनी पुढाकार घेत चिकलठाणा एमआयडीसी भागात २५० बेडचे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. अवघ्या काही दिवसांत हे कामही पूर्ण करण्यात आले. शुक्रवारी लोकार्पणानंतर रुग्णालय महापालिकेच्या ताब्यात येईल; पण रुग्णालय चालविण्यासाठी महापालिकेकडे अत्यावश्‍यक स्टाफ नाही. त्यामुळे महापालिकेने गुरुवारी १४० पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. 

सुरवातीला जिल्हा रुग्णालयाची मदत 
मुलाखतीनंतर डॉक्टर, नर्ससह इतर कर्मचारी रुजू होण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे सुरवातीला जिल्हा सामान्य रुग्णालयाची मदत घेऊन येथे कोविड-१९ रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. पदभरतीनंतर मात्र संपूर्णपणे महापालिकेतर्फे हे रुग्णालय चालविले जाणार आहे. 

तीन महिन्यांसाठी नियुक्ती
तीन महिन्यांसाठी किंवा कोरोनाची साथ संपेपर्यंत या डाॅक्टारांची तसेच कर्मचाऱ्यांची नियुक्ती राहिल, असे महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी देखील महापालिकेने कंत्राटी पद्धतीने एमबीबीएस डाॅक्टरांची कोरोनासाठी नियुक्ती केली आहे. 

रिकामे हात अन् हवालदिल मन...मजुरांची अशीही व्यथा   

अशी आहेत पदे 
वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन)- १३ 
वैद्यकीय अधिकारी-३० 
हॉस्पिटल व्यवस्थापक-२ 
स्टाफ नर्स-६३ 
एक्सरे टेक्निशियन-२ 
ईसीजी टेक्निशियन-२ 
लॅब टेक्निशियन-६ 
फार्मासिस्ट-८ 
भांडारपाल-२ 
डीईओ-४ 
वॉर्ड बॉय-२० 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Recruitment of 140 posts for Kovid Hospital