esakal | मारकुट्या पतीला नागरिकांनीच हातपाय बांधून टाकले रस्त्यावर! पत्नीला द्यायचा रोजच त्रास
sakal

बोलून बातमी शोधा

3crime_201_163

पती चोवीस तास नशेत असायचा. पत्नीला शिवीगाळ, मारहाण करणे तर नित्याचेच. इतकेच नव्हे तर शेजाऱ्यापाजाऱ्यांना, पूर्ण गल्लीतील नागरिकांना अश्‍लील भाषेत शिवीगाळ करत त्याची संध्याकाळ होत असे.

मारकुट्या पतीला नागरिकांनीच हातपाय बांधून टाकले रस्त्यावर! पत्नीला द्यायचा रोजच त्रास

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : पती चोवीस तास नशेत असायचा. पत्नीला शिवीगाळ, मारहाण करणे तर नित्याचेच. इतकेच नव्हे तर शेजाऱ्यापाजाऱ्यांना, पूर्ण गल्लीतील नागरिकांना अश्‍लील भाषेत शिवीगाळ करत त्याची संध्याकाळ होत असे. सोमवारी मात्र मारकुट्या पतीने पत्नीला मारहाण करत गल्लीत ओढत आणले अन् गळ्याला चाकू लावून चिरण्याचा प्रयत्न करू लागला. त्याचा हा प्रताप पाहून गल्लीतील नागरिकांनी त्याचा चांगलाच समाचार घेत अद्दल घडविण्यासाठी चक्क हातपाय बांधून रस्त्यावर टाकून दिले. पुंडलिकनगर पोलिसांच्या हद्दीतील या घटनेत अखेर पतीची कीव आल्याने पत्नीनेच दामिनी पथकाला संपर्क केला अन् पथकाने त्याची सुटका करत पोलिसाच्या हवाली केले.


२७ वर्षीय विजयमाला (काल्पनिक नाव) ही पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झोपडपट्टी परिसरात राहते. तिला तीन गोंडस मुली. पती प्रचंड व्यसनी, चिमुकल्यांकडे पाहून तरी चांगले राहा असा वारंवार पत्नीने दिलेला सल्ला नशेत राहणाऱ्या पतीला कधी रुचलाच नाही. संसाराचा गाडा हाकण्यासाठी ती धुणीभांडी करते. पती रोज व्यसन करून तिच्यासह मुलींनाही मारहाण करतो. सोमवारी दुपारीही त्याने तसेच केले. पत्नीला बेदम मारहाण करत गल्लीत ओढत आणले अन् तिच्या गळ्याला चाकू लावून चिरण्याचा प्रयत्न करत होता. हा प्रकार पाहून गल्लीतील लोकांनी त्याला अडवले असता, तो त्यांनाही अश्‍लील शिवीगाळ करतच होता.


शेवटी ‘ती’लाच कीव आली
गल्लीतील नागरिकांनी संतापून त्याला चोप दिला अन् हातपाय बांधून त्याला रस्त्यावर टाकून दिले. अखेर पत्नीलाच त्याची कीव आली अन् त्याच्या सुटकेसाठी तिने थेट महिला भरोसा सेलच्या दामिनी पथकाला संपर्क केला. भरोसा सेलच्या पोलिस निरीक्षक किरण पाटील यांनी तत्काळ दामिनी पथकप्रमुख उपनिरीक्षक स्नेहा करेवाड आणि त्यांच्या चमूला घटनास्थळी पाठविले. पथकाने त्याला पुंडलिकनगर पोलिसांच्या हवाली केले.

Edited - Ganesh Pitekar