‘साई’ला पाच कोटींची मदत : किरेन रिजीजू

अतुल पाटील 
Friday, 25 December 2020

किरण रिजीजू म्हणाले, की देशातील विविध राज्यात नॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स देण्याचे ठरवले आहे. प्रत्येक राज्यात हे सेंटर नाहीत. महाराष्ट्र असे राज्य आहे, जिथे मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद अशा तीन ठिकाणी हे सेंटर आहेत.

औरंगाबाद : येथे येण्यापूर्वीच खेळाडूंसाठी विशेष साहित्य खरेदी करण्यासाठी पाच कोटी रुपयांची मंजुरी देऊन आलो आहे, अशी घोषणा केंद्रीय क्रीडा व युवक कल्याणमंत्री किरेन रिजीजू यांनी केली. भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) मधील स्टेनलेस स्टीलचा जलतरण तलाव, सिंथेटिक हॉकी टर्फचे उद्‍घाटन आणि तलवारबाजी सभागृहाच्या कोनशिलेचे अनावरण गुरुवारी त्यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमासाठी खासदार इम्तियाज जलील, डॉ. भागवत कराड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले, आमदार अतुल सावे, अंबादास दानवे, विरेंद्र भांडारकर आदींची उपस्थिती होती.

किरण रिजीजू म्हणाले, की देशातील विविध राज्यात नॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स देण्याचे ठरवले आहे. प्रत्येक राज्यात हे सेंटर नाहीत. महाराष्ट्र असे राज्य आहे, जिथे मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद अशा तीन ठिकाणी हे सेंटर आहेत. तसेच प्रत्येक सेंटरमध्ये तीन किंवा चारच खेळाचे प्रकार आहेत. एक राज्य एक खेळ हे धोरण असताना औरंगाबादेत मात्र आर्चरी, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, फेन्सिंग, हॉकी, वेटलिफ्टिंग आणि जिमनॅस्टिक्स असे सात खेळ सुरू आहेत. जिमनॅस्टिक बंद केले होते, इथल्या खासदारांच्या मागणीनुसार आम्ही पुन्हा सुरु केले. त्याशिवाय ३०० खाटांचे २८ कोटी रुपयांचे वसतिगृह उभारले जात आहे.

क्रीडा धोरणांवर मी टीका करायचो तर, पंतप्रधानांनी मलाच क्रीडामंत्री केले. ‘खेलो इंडिया’ आणि ‘फीट इंडिया’याद्वारे बदल घडत आहेत. खेळ हा राज्यसूचीतील विषय आहे, तरीही केंद्र सरकार खर्च करत आहे. ऑलम्पिकमध्ये येत्या आठ वर्षात देशाचा टक्का वाढावा, अशी इच्छा आहे. त्यात औरंगाबादच्या केंद्रातून १० ते २० खेळाडू असावेत. तसेच देश टॉप टेनमध्ये असेल. ‘खेलो इंडिया’मधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला निधी देण्यात येईल, असा शब्द रिजीजू यांनी कुलगुरु डॉ. येवले यांना दिला. दरम्यान, श्री. रिजीजू यांनी यावेळी खेळाडूंशी आहार आणि खेळाविषयी चर्चा केली.

हे ही वाचा : जीन्स, टी-शर्टला आता महापालिकेतही बंदी ; अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी असेल ड्रेस कोड 

राष्ट्रीय क्रीडा संस्थेची मागणी

‘साई’मध्ये पतियाळाप्रमाणे राष्ट्रीय क्रीडा संस्था (एनआयएस) सुरु करावी. त्यात डिप्लोमा कोर्स सुरु करावा. तसेच जिम्नॅस्टिक्ससाठी हॉल, ॲथलेटिक्ससाठी सिंथेटिक टर्फ देण्यात यावी, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील आणि डॉ. कराड यांनी मागणी केली. या मागणीला रिजीजू यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

परंपरेला संस्कृती बनवण्यात अपयशी

भारतात खेळ ही परंपरा राहिली आहे. पण आज आपण त्याला जगण्याचा भाग बनवू शकलो नाही. परंपरा असली तरी, संस्कृती बनविण्यात अपयशी ठरलो. त्यामुळेच तीस लाख लोकसंख्या असलेले देश तीन-चार ऑलम्पिक पदके घेऊन जातात. हे १३८ कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशासाठी चांगले नाही, असे त्यांनी नमूद केले.

म्हणून ‘त्यांना’ गावाकडे नेले

दोन वर्षापूर्वी औरंगाबादेत ख्यातनाम गायिका आशा भोसले यांचा कार्यक्रम झाला होता, मी प्रमुख पाहुणा होतो. मला नव्या गाण्यांपेक्षा जुनी गाणीच आवडतात. म्हणूनच त्यांना अरुणाचल प्रदेशला घेऊन जात त्यांची गाणी गावाकडच्या लोकांना ऐकवली. अजिंठा-वेरुळमुळे या भागावर प्रेम होते. तसेच इथले लोक सांस्कृतिक, मेहनती आहेत, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rs five crore has been sanctioned for the purchase of special equipment for the players announced Union Sports and Youth Welfare Minister Kiren Rijiju