Corona virus : रात्री दहा नंतर बाहेर पडू नका... आयुक्तांच्या नावाने अफवा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 मार्च 2020

आयुक्त आस्तिकुमार पांडेय यांच्या नावाने सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. ही अफवा असल्याचा खुलासा आयुक्तांनी केला असून, याबाबात अद्याप पोलिसांत तक्रार देण्यात आलेली नाही. 

औरंगाबाद : कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शहरभर औषधी फवारणी केली जाणार असून, रात्री १० ते पहाटे पाच वाजेपर्यंत नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशा आशयाचा फेक मेसेज महापालिका आयुक्त आस्तिकुमार पांडेय यांच्या नावाने सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. ही अफवा असल्याचा खुलासा आयुक्तांनी केला असून, याबाबात अद्याप पोलिसांत तक्रार देण्यात आलेली नाही. 

कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली असून, नागरिकांनी आवश्‍यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. मात्र गुरुवारी (ता. १९) सायंकाळपासून महापालिका आयुक्तांच्या नावाने फेक मेसेज सोशल मिडीयावरून व्हायरल होत आहे. त्यात ‘महापालिका आयुक्तांचा संदेश...नमस्कार मी तुम्हांला विनंती करतो की आज रात्री १० नंतर व उद्या पहाटे पाच वाजेपर्यंत तुम्ही घराबाहेर पडू नयेत.... कोव्हीड -१ च्या मृत्यूसाठी हवेत औषधाची फवारणी होईल. आपल्या सर्व मित्रांना, नातेवाईकांना आणि आपल्या कुटुंबीयांना ही माहिती सामायिक करा...’, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. अनेकांनी महापालिका अधिकाऱ्यांना याबाबत चौकशी केली. ही माहिती आयुक्तांना कळविण्यात आली. त्यावर त्यांनी अशा प्रकारची कुठलीही औषधी फवारणी केली जाणार नाही, नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेऊ नये, असे आवाहन केले.

हेही वाचा- आता गर्दी कराल तर गुन्हे दाखल होणार

पावणेदोन हजार प्रवाशांचे स्क्रीनिंग 
शहरात मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, यवतमाळ या सहा ठिकाणांहून म्हणजेच ज्या ठिकणी कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत अशा शहरात येणाऱ्या प्रवाशांचे विमानतळ, रेल्वेस्टेशन, सिडको व मध्यवर्ती बसस्थानक, छावणी जकात नाका येथे स्क्रीनिंग केले जात आहे. आतापर्यंत १,८१६ प्रवाशांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती गुरुवारी (ता. १९) पत्रकार परिषदेत महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. यावेळी क्रेडाईचे नरेंद्रसिंग जाबिंदा, संग्राम पठारे, आशिष नावंदर, भास्कर चौधरी, अनिल मुनोत यांच्यासह एमआयएमचे गटनेते गंगाधर ढगे यांची व महापालिका अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

चिकलठाण्यात आयसोलेटेड वॉर्ड 
चिकलठाणा येथे ३० बेडचा आयसोलेटेड वॉर्ड तयार केला जात आहे. दोन दिवसांत हे काम पूर्ण होणार आहे. त्यासाठी व्यापारी महासंघ सहकार्य करीत असल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले. 
 
१४ दिवस ठेवणार निगराणीत 
अलगीकरण कक्षात आणलेल्या व्यक्तीला १४ दिवस निगराणीत ठेवले जाईल. यासाठी डॉक्टर व नर्सची एक टीम येथे कार्यरत राहणार आहे. अग्निशमनाची एक टीम, रुग्णवाहिका येथे कार्यरत असेल. १४ दिवसांत संबंधिताच्या कुटुंबीयांस, नातेवाइकांस भेटू दिले जाणार नाही; तसेच संबंधितासही बाहेर जाण्यास प्रतिबंध असेल, असे महापौरांनी सांगितले. 
 
‘देवगिरी’चे वसतिगृह, एमटीडीसीचे विश्रामगृह ताब्यात 
शहरात कोरोना व्हायरसाचे रुग्ण वाढलेच तर उपाययोजना म्हणून विविध ठिकाणी आयसोलेटेड व क्‍वॉरंटाइन वॉर्ड तयार करण्याचे नियोजन महापापालिकेकडून केले जात आहे. देवगिरी महाविद्यालयातील वसतिगृहाच्या २५० खोल्या, एमसीईडी येथे ४० खोल्या तर एमटीडीसी येथे ८२ खोल्या असून, त्या ताब्यात घेण्यात आल्या असल्याचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सांगितले. याठिकणी आवश्यकतेनुसार आयसोलेटेड व क्‍वॉरंटाइन वॉर्ड तयार केले जाणार आहेत. 

हेही वाचा- औरंगाबादेत 28 संशयित रुग्ण होम क्वारंटाईन

 
औषध फवारणी संदर्भात मी कुठलेही विधान केलेले नाही. बनावट संदेशात नमूद केलेले असे कोणतेही औषध अद्याप सापडलेले नाही. त्यामुळे मेसेजवर कोणी विश्‍वास ठेऊ नये. ज्यावेळी नागरिकांना संदेश द्यायचा असेल तेव्हा मी व्हिडिओ संदेश पाठवेन. 
आस्तिककुमार पांडेय, महापालिका आयुक्त. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rumor in Astikumar Pandey