‘सारी’ने औरंगाबादेत आणखी तीन बळी, एकूण मृतांची संख्या १४ वर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 April 2020

कोराना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क आहे; मात्र दुसरीकडे गेल्या दोन आठवड्यांपासून शहरात सारीचे रुग्ण वाढतच आहेत. गेल्या दोन आठवड्यांत ‘सारी’मुळे तब्बल ११ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात आणखी तिघांची भर शनिवारी पडली. 

औरंगाबाद : कोरोनाची सर्वत्र दहशत असतानाच ‘सारी’च्या आजाराने मृत्यू जास्त होत असल्याने औरंगाबादेत खळबळ उडाली असून, शनिवारी (ता. ११) आणखी तिघांचा मृत्यू झाला. यापूर्वीच ‘सारी’च्या आजाराने ११ जणांचा मृत्यू झाला होता. आज दिवसभरात ‘सारी’चे २१ रुग्ण दाखल झाले आहेत. 

कोराना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क आहे; मात्र दुसरीकडे गेल्या दोन आठवड्यांपासून शहरात सारीचे रुग्ण वाढतच आहेत. गेल्या दोन आठवड्यांत ‘सारी’मुळे तब्बल ११ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात आणखी तिघांची भर शनिवारी पडली. 

यासंदर्भात फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून माहिती देताना महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, की शनिवारी दिवसभरात सारीचे २१ रुग्ण दाखल झाले आहेत. त्यांपैकी १५ रुग्ण खासगी दवाखान्यांत, तर सहा रुग्ण घाटी रुग्णालयात दाखल झाले आहेत. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये एकजण जालना येथील आहे, तर दोन जण औरंगाबादेतील आहेत. मृत्यू पावलेल्या तिघांचे कोरोना अहवाल अद्याप प्राप्त झाले नसल्याचे महापौरांनी नमूद केले. 

औरंगाबादेतील कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

दरम्यान, कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णात शनिवारी कोणतीही वाढ झाली नसल्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले. कोरोना नमुन्यांचे २१ अहवाल शनिवारी प्राप्त झाले, हे सर्व अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या चोवीस तासांत शहरात प्रवेश करणाऱ्या ७७१ जणांची स्क्रीनिंग करण्यात आले असल्याचेही त्यांनी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SARI Killed 3 In Aurangabad Toll Rise To 14