शाळा सुरु झाल्यानंतरही विद्यार्थी घरीच, शिक्षकांच्या आंदोलनाचा फटका का?

संदीप लांडगे
Wednesday, 10 February 2021

अनुदानासाठी शिक्षकांचे आझाद मैदानावर विराट आंदोलन सुरु आहे. त्यासाठी औरंगाबाद विभागातून सुमारे सात हजार शिक्षक मुंबईला रवाना झाले आहेत.

औरंगाबाद : राज्यातील सर्व घोषित, अघोषित अशंत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांना अनुदान मिळावे म्हणून राज्यातील विविध शिक्षक, शिक्षकेत्तर महामंडळ लढा देत आहे. त्याअनुषंगाने २९ जानेवारीपासून राज्यातील सर्व शिक्षक संघटना, महामंडळे एकत्र येऊन मुंबई येथील आझाद मैदानावर विराट आंदोलन सुरु आहे. त्यासाठी सर्व शिक्षक मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. याचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.

अनुदानासाठी शिक्षकांचे आझाद मैदानावर विराट आंदोलन सुरु आहे. त्यासाठी औरंगाबाद विभागातून सुमारे सात हजार शिक्षक मुंबईला रवाना झाले आहेत. त्यामुळे अनुदानाच्या प्रतिक्षेत असलेल्या सर्व शाळा सध्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी नुकतेच शासनाने शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यात दहावीच्या विद्यार्थ्यांचे महत्वाचे वर्ष आहे. परीक्षा तोंडावर आल्या असताना कोरोनामुळे आभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. असे असताना अनुदानासाठी शाळा बंद ठेवल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालक नाराजी व्यक्त करत आहे.  

आंदोलनाचा विषय
राज्यातील २७६ प्राथमिक शाळा, एक हजार ३१ तुकड्यांवरील २ हजार ८५१ शिक्षक, १२८ माध्यमिक शाळा व ७९८ तुकड्यावरील २ हजार १६० शिक्षक तर एक हजार ७६१ उच्च माध्यमिक शाळा व ५९८ तुकड्यावरील ९ हजार ८८४ शिक्षकांना २० टक्के अनुदान जाहीर करण्यात आले आहे. तसेच २ हजार ४१७ शाळा, ७ हजार ५६१ तुकड्यावरील २८ हजार २१७ शिक्षक ४० टक्क्यांसाठी घोषित करण्यात आले आहे. १४ ऑक्टोबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रतिक्षेतील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना १ नोव्हेंबरपासून २० टक्के अनुदान तर यापूर्वी २० टक्के अनुदान घेणाऱ्यांना ४० टक्के अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला होता. याची १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी अपेक्षित असतांना शासनाने अद्यापही कुठलाच निर्णय घेतलेला नाही. यामुळे राज्यातील ४२ हजार शिक्षकाचा भ्रमनिरास झाला आहे.

 

कोरोनानंतर शाळा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण होते. शाळा बंद ठेवल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ज्या शाळा आंदोलनामुळे बंद ठेवण्यात आल्या आहेत, त्यांचा आढावा घेवून कारवाई करण्यात येईल.
- डॉ. बी.बी. चव्हाण शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग

आंदोलनासाठी तीन दिवस शाळा बंद ठेवणार असल्याचे शासनाला निवेदनाद्वारे कळवले होते. मात्र, संस्था महामंडळाने स्वयंपुर्तीने शाळा बंद ठेवल्या आहेत. मात्र, शासनाकडून कोणतीही दखल घेण्यात येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाला शासनच जबाबदार आहे.
- रविंद्र तम्मेवार, समन्वयक, शिक्षक समन्वयक संघ

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Schools Reopen But Students Still At Home Aurangabad Live News