esakal | खबरदारी...सिडकोतील 300 घरे केली सील, कर्मचाऱ्यांनी मांडले ठाण
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद : आरेफ कॉलनी भागात पाहणी करून आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करताना नंदकुमार घोडेले.

एन-चार भागात शंभर मीटरपर्यंतचा परिसर सील करण्यात आला आहे. त्यात सुमारे तीनशे घरे असून, या घरातील नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या टीम तयार करण्यात आल्या असून, हे कर्मचारी १४ दिवस येथे ठाण मांडून राहणार आहेत. 

खबरदारी...सिडकोतील 300 घरे केली सील, कर्मचाऱ्यांनी मांडले ठाण

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद - सिडको एन-चार येथील महिला व आरेफ कॉलनीतील तरुण कोरोनाबाधित आढळल्यानंतर या दोघांच्या संपर्कात आलेल्या ३२ जणांचे आतापर्यंत स्वॅब (लाळेचे नमुने) घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. सिडको एन-चार भागात सुमारे तीनशे घरांना सील करण्यात आले असून, नागरिकांची तपासणी करण्यासाठी याठिकाणी महापालिकेच्या आरोग्य विभागाचे पथक तळ ठोकून आहे. आरेफ कॉलनीत मात्र नागरिकांनी तपासणीसाठी विरोध केल्याने प्रशासन हतबल झाले आहे. 

प्रशासकीय यंत्रणा सतर्क
सिडको एन-चार भागातील एका महिलेचा तर आरेफ कॉलनीतील एक तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासकीय यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. दोन) रात्री या दोन्ही परिसरात जाऊन खबरदारी म्हणून उपाययोजना सुरू केल्या आहेत. शुक्रवारी (ता. तीन) सकाळी महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, भाजप गटनेते प्रमोद राठोड यांनी पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांना माहिती देताना महापौर म्हणाले, सिडको एन-चार भागात शंभर मीटरपर्यंतचा परिसर सील करण्यात आला आहे. त्यात सुमारे तीनशे घरे असून, या घरातील नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या टीम तयार करण्यात आल्या असून, हे कर्मचारी १४ दिवस येथे ठाण मांडून राहणार आहेत. नागरिकांच्या तपासणीनंतर कोणाला काही त्रास असल्यास जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना हे पथक आपला अहवाल देईल. डॉ. सविता कुलकर्णी यांच्यावर ही जबाबदारी आहे. 

हेही वाचा- प्राणी संग्रहालयात हरणाचा बळी

मोलकरणीसह मुलीचे घेतले स्वॅब
संबंधित महिलेच्या संपर्कात आलेल्या १३ जणांचे स्वॅब गुरुवारी रात्रीपर्यंत घेण्यात आले होते. शुक्रवारी आणखी १२ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. संबंधित महिलेने यापूर्वी खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते. हे रुग्णालय सील करण्यात आले आहे. तिच्या घरी मोलकरीण येत नव्हती; मात्र मोलकरणीची मुलगी कामाला येत होती. त्यामुळे या मुलीसह तिच्या आईचे देखील स्वॅब घेण्यात आले आहेत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महिलेचा पती धुळे, 
नाशिकमध्ये कार्यक्रमात सहभागी 

एन-चार येथील महिलेचा पती दिल्ली येथून घरी आला होता. त्यामुळे पतीपासून तिला कोरोनाची बाधा झाल्याचे सांगितले जात आहे. तिच्या पतीचा अहवाल गुरुवारपर्यंत प्राप्त झाला नव्हता; मात्र दरम्यानच्या काळात महिलेचा पती धुळे येथे एका लग्न समारंभात व नाशिक येथील एका कार्यक्रमात सहभागी झाल्याचे समोर आले आहे. त्यानुसार तेथील जिल्हा प्रशासनाला माहिती कळविण्यात आली असल्याचे महापौरांनी सांगितले. 

आमच्या घरी कशाला येता? 
आरेफ कॉलनीत आरोग्य तपासणीला शुक्रवारी विरोध करण्यात आला. तुम्ही आमच्या घरी कशाला येता? आमच्याशी कशाला बोलता? असे प्रश्‍न आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना करण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले. दरम्यान, या तरुणाच्या घरी धुणीभांडी करण्यासाठी येणाऱ्या महिलेला दक्षता म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे; तसेच तरुणाच्या संपर्कात आलेल्या सात जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. हा तरुण मगरपट्टा भागातील एका कंपनीत काम करतो, तर कोंडवा भागात राहत होता. त्यामुळे पुणे जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत माहिती कळविण्यात आली असल्याचे महापौरांनी नमूद केले.