
घाटी रुग्णालयात ‘एमबीबीएस’च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने विषारी रसायन सेवन करुन आत्महत्या केली.
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात ‘एमबीबीएस’च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने विषारी रसायन सेवन करुन आत्महत्या केली. त्याचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी (ता.एक) मध्यरात्रीनंतर मृत्यू झाला. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, यश नरसिंगराव गंगापूरकर (२२, मुळ रा. नांदेड, ह. मु. ब्राम्हण गल्ली) असे मृताचे नाव आहे. यश गत दोन वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘एमबीबीएस’चे शिक्षण घेत होता. तो बेगमपुरा भागातील ब्राह्मण गल्लीत बहिण व आईसोबत राहत होता. २५ डिसेंबरला त्याने आई व बहिणीला साबण आणण्यासाठी घराबाहेर पाठवले. त्यानंतर त्याची आई व बहिण घरी येण्यापूर्वी तो घराबाहेर गेला व विषारी रसायन सेवन केले.
त्यानंतर त्याने लगेचच घर गाठले. अचानक उलटी झाल्याने दोघींना संशय आला. त्यांनी यशला तात्काळ घाटीत दाखल केले. उपचारानंतर त्याला गारखेडा परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यादरम्यान, बेगमपुरा पोलिसांनी त्याचा जवाब नोंदविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही. शुक्रवारी रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद बेगमपुरा पोलिस ठाण्यात करण्यात आली. तपास जमादार राजकुमार जाधव करीत आहेत.
तो होता मानसिक तणावात
यशने सेवन केलेला विषारी रसायनाचा डोस मोठा होता. त्याच्यावर घाटीत उपचार व एकेक अवयव निकामी होत गेला. त्यानंतर त्याची किडनी निकामी झाली होती. त्यानंतर त्याचा रात्री मृत्यू झाला. काही दिवसांपासून तो मानसिक तणावात होता. त्याचा कुणाशीही जास्त संपर्क नव्हता अशी माहितीही समोर आली आहे.
संपादन - गणेश पिटेकर