शिवसेना म्हणते, संभाजीनगर आणि कॉंग्रेस म्हणते औरंगाबाद; भाजपच्या राजू शिंदेंचा टोला

प्रकाश बनकर
Saturday, 9 January 2021

संभाजीनगर करण्याची भाषा करणाऱ्या पक्षाच्याच पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ‘लव्ह औरंगाबाद’चे उद्‍घाटन केले.

औरंगाबाद : औरंगाबादचे नाव ‘संभाजीनगर’ करणे हा आस्थेचा विषय आहे. आता आगामी निवडणुका आल्याने यावरून राजकारण सुरु झाले आहे. याची सुरुवात शिवसेनेनेच केली आहे. संभाजीनगर करण्याची भाषा करणाऱ्या पक्षाच्याच पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ‘लव्ह औरंगाबाद’चे उद्‍घाटन केले. पालकमंत्रीच ‘लव्ह औरंगाबाद’चे जनक असल्याचा आरोप माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी शुक्रवारी (ता.८) केला.

जिओ डिलरशिपच्या आमिषाने सव्वा कोटीचा गंडा, आर्थिक गुन्हे शाखेने चौघांना ठोकल्या बेड्या

भाजप अनूचित जाती मोर्चाच्यावतीने आमदार नमिता मुंदडा यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी राजू शिंदे यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या विषयावर शिवसेनेवर आरोप केला. राजू शिंदे म्हणाले, की शहराच्या नामांतराचा प्रश्‍न हा आस्थेचा विषय बनला आहे. शिवसेना म्हणते, संभाजीनगर आणि कॉंग्रेस म्हणते औरंगाबाद. मात्र या दोन्ही पक्षांची मिलिभगत आहे. शिवसेनेनेच याची सुरुवात केली. दोन महिन्यांपूर्वी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत ‘लव्ह औरंगाबाद’च्या फलकाचे उद्‍घाटन केले.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

तसेच संभाजीनगरला विरोध करणारे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना शहरात येऊ देणार नसल्याची भाषा करणारे ‘लव्ह औरंगाबाद’चे उद्‍घाटन करणाऱ्या पालकमंत्र्यांना अडवणार का? संभाजीनगरची भाषा करणाऱ्या शिवसेनेला ‘लव्ह औरंगाबाद’चे उद्‍घाटन कसे चालते, याचे उत्तर द्यावेत असेही राजू शिंदे म्हणाले. विमानतळाला संभाजीनगर नाव मिळणार आहे. तसेच शहराचे संभाजीनगर नाव मिळवण्यासाठी आता आम्ही ‘नमस्कार संभाजीनगर’ ही टॅगलाईन यापुढे वापरू, असेही राजू शिंदे म्हणाले.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena And Congress Play Aurangabad Renaming Politics Aurangabad News