esakal | रस्त्यांच्या श्रेयावरून पेटला शिवसेना-भाजपमध्ये वाद, भाजप आमदाराने फोडले नारळ
sakal

बोलून बातमी शोधा

0Shivsena_Bjp_45

औरंगाबाद शहरातील विकास कामांच्या श्रेयावरून शिवसेना-भाजपमध्ये वारंवार धुसफुस सुरू आहे.

रस्त्यांच्या श्रेयावरून पेटला शिवसेना-भाजपमध्ये वाद, भाजप आमदाराने फोडले नारळ

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : शहरातील विकास कामांच्या श्रेयावरून शिवसेना-भाजपमध्ये वारंवार धुसफुस सुरू आहे. आता राज्य शासनाच्या निधीतून सुरू असलेल्या १५२ कोटींच्या रस्त्यावरून वाद पेटला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या रस्ते कामांचे भूमिपूजन करण्यात आले होते. असे असतानाच भाजपचे आमदार अतुल सावे यांनी बुधवारी (ता. ३०) पूर्व विधानसभा मतदारसंघातील तीन रस्ते कामांचे भूमिपूजन केले. त्यावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. शिवसेनेचे पूर्व विधानसभा संघटक राजू वैद्य यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेत हा प्रकार म्हणजे ‘लोकांच्या लेकराला स्वतःचे नाव देण्याचा प्रयत्न’ असल्याची खरमरीत टीका केली आहे.


राज्य शासनाने शहरातील रस्त्यांसाठी १५२ कोटींचा निधी दिला आहे. महापालिका, एमएसआरडीसी, एमआयडीसीतर्फे शहरात या निधीतून २३ रस्त्यांची कामे केली जात आहेत. एमआयडीसीने दोन महिन्यांपूर्वीच कामे सुरू केली. त्यानंतर एमएसआरडीसीचे कामे सुरू झाली. दरम्यान १२ डिसेंबरला मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते औपचारिकरीत्या या कामाचे भूमिपूजनही झाले. या निधीतून पूर्व विधानसभा मतदारसंघात सिडको चौक ते मुकूंदवाडी रेल्वेस्टेशन, भवानी पेट्रोल पंप ते ठाकरेनगर, महालक्ष्मी चौक ते लोकशाही कॉलनी या रस्त्यांची कामे केली जात आहेत. या कामांचे भूमिपूजन आमदार सावे यांच्या हस्ते बुधवारी जयभवानीनगर येथे झाला. माजी नगरसेवक प्रमोद राठोड, शिवाजी दांडगे, अ‍ॅड. माधुरी अदवंत, मनिषा मुंडे, गोविंद केंद्रे, कैलास गायकवाड, बालाजी मुंडे, लक्ष्मीकांत थेटे, संजय बोराडे, रामेश्वर दसपुते, ताराचंद गायकवाड, अर्जुन गवारे, श्रीकांत घुले, अभिजीत गरकल, विठ्ठल शेलार, शिवाजी शिरसे, प्रमोद दिवेकर, प्रशांत नांदेडकर, राहुल दांडगे, महेश राऊत, शैलेश हेकाडे, त्रंबक राजपूत, शैलेश भिसे भिसे उपस्थित होते. या कार्यक्रमावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे.


लोकांच्या लेकरांना स्वतःचे नाव देण्याचा भाजपचा प्रयत्न
राजू वैद्य यांनी भाजपवर टीका करताना म्हटले आहे, ‘‘मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कामांचे भूमिपूजन झालेले असताना आज भाजपने पुन्हा भूमिपूजन केले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेत या रस्त्यांच्या कामाचे श्रेय लाटण्याचे काम भाजपचे आमदार करत आहेत. हा प्रकार म्हणजे लोकांच्या लेकराला स्वतःचे नाव देण्याचा प्रयत्न आहे!’’

Edited - Ganesh Pitekar