Shivjayanti 2020 : छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी 

राजेभाऊ मोगल
Wednesday, 19 February 2020

जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमींची भावना लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी सुद्धा जिल्ह्यातील सर्व पुतळ्यांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने आईसाहेब चौक हर्सूल येथील राजमाता जिजाऊ साहेबांच्या पुतळ्यावर व टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावर तसेच वैजापूर येथे शिवाजी महाराज, महाराणा प्रताप व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तिन्ही पुतळ्यांवर एकत्रित पुष्पवृष्टी करण्यात आली.

औरंगाबाद : सुवर्णमहोत्सवी जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीतर्फे यंदाचा शिवजन्मोत्सव समाजाभिमुख उपक्रम आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. बुधवारी (ता.१९) सकाळी १० वाजता दौलताबाद ते क्रांती चौक दरम्यान भव्य मशाल फेरी तर सकाळी साडेदहा वाजता क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टि करुन अभिवादन करण्यात आले. या ठिकाणी सकाळपासूनच शिवप्रेमीनी प्रचंड गर्दी केली आहे.

Shivjayanti 2020 : या गावात आहे महाराष्ट्रातलं दुसरं शिवाजी महाराजांचं मंदिर...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर २ वेळा हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी झाल्यानंतर संस्थान गणपती येथून दुपारी साडेबारा वाजता पर्यावरण संवर्धनासाठी सायकल फेरीने मुख्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. यंदाची ही शिवजयंती महिला सुरक्षेचा संकल्प करून साजरी करण्यात येत आहे.

शिवजयंती कशा प्रकारे साजरी करावी, याबाबत शिवप्रेमींच्या सूचना जाणून घेण्यात आल्या होत्या. या सूचनांचे संकलन करून त्यावर योग्य पद्धतीने जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने अंमलबजावणी करण्यात आली असून, शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने गेली ५१ वर्षे सातत्याने संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती साजरी करण्यात येत आहे.

Shivjayanti 2020 : असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर, पत्र अजूनही सुरक्षित​

शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने महिला-मुलींच्या संरक्षणासाठी निर्माण करण्यात आलेल्या ॲपचे लोकार्पणही करण्यात आले असून, याचा उपयोग राज्य शासनाने योग्य पद्धतीने केला तर एक नवा इतिहास निर्माण होईल अशी भावना नवनिर्वाचित अध्यक्ष विनोद पाटील यांनी व्यक्त केली.

यावेळी जिल्हा महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, अध्यक्ष विनोद पाटील, कार्याध्यक्ष उपमहापौर राजेंद्र जंजाळ, अभिजित देशमुख, अतीक मोतीवाला, विनोद बनकर, गजनन पाटील, अमोल साळुंके पाटील, विशाल विटाळे, दत्ता भांगे, सदाशिव बोंबले, सचिन अंभोरे, राजेंद्र दाते पाटील, प्रशांत शेळके, प्रवीण भोसले, आबासाहेब साळुंके, राज वानखेडे, बाळासाहेब औताडे, मनोज पाटील, रमेश गायकवाड, अनिकेत पवार, जिजाऊ ब्रिगेडच्या हेमा पाटील, संगीता भुजंग, वैशाली कडू पाटील, नीता देशमुख, अनुराधा ठोंबरे, अनुपमा पाथ्रीकर यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. 

विशेष आकर्षण 

आर.आर.पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष व मराठा आरक्षणासाठी कोर्टात लढा देणारे विनोद पाटील हे तिसऱ्यांदा औरंगाबाद सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आहेत. वर्ष २०१८ मध्ये शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राहिलेल्या विनोद पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शहरातील सर्व पुतळ्यांवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी केली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पुतळ्यांच्या संख्येत वाढ होऊन ७६ पर्यंत ही संख्या गेली आहे. तब्बल ७६ ठिकाणी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याचा हा देशातील पहिलाच प्रसंग ठरला आहे.

जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमींची भावना लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी सुद्धा जिल्ह्यातील सर्व पुतळ्यांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने आईसाहेब चौक हर्सूल येथील राजमाता जिजाऊ साहेबांच्या पुतळ्यावर व टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावर तसेच वैजापूर येथे शिवाजी महाराज, महाराणा प्रताप व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तिन्ही पुतळ्यांवर एकत्रित पुष्पवृष्टी करण्यात आली, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी दिली. 

काकासाहेब शिंदे यांना अभिवादन 

मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेऊन बलिदान देणारे काकासाहेब शिंदे यांच्या कायगाव टोका, गंगापूर येथील अर्धाकृती पुतळ्यावर सुद्धा आर.आर.पाटील फाउंडेशनच्या वतीने हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आले. 

‘एमबीएन’ने काढली पाचशेहून अधिक वाहनांची फेरी 

जयंतीनिमित्त मराठा बिझनेस नेटवर्कतर्फे (एमबीएन) पाचशेहून अधिक वाहनांची बुधवारी (ता. १९) चारचाकी, दुचाकी फेरी काढण्यात आली. 
मराठा समाजाने मोठे व्यवसाय करणे, व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देणे व त्यातून एक सक्षम समाज व समृद्ध भारत घडविण्यास हातभार लावणे हा या फेरीचा उद्देश आहे.

Shivjayanti 2020 : संताप येईल शिवाजी महाराजांच्या मूळ गावातील गढीची अवस्था...

संग्रामनगर उड्डाणपुलाजवळील जबिंदा मैदान येथून सकाळी साडेआठ वाजता विवेक भोसले यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. ही फेरी जाबिंदा-दर्गा-सूतगिरणी-गारखेडा-गजानन मंदिर-पुंडलिकनगर-जयभवानी चौक-कामगार चौक-महालक्ष्मी चौक-सोहम मोटर्स-सिडको-आकाशवाणी-मोंढा उड्डाणपूल-हॉटेल अमरप्रीत-क्रांती चौक उड्डाणपूल-बाबा पेट्रोलपंप (यू टर्न) क्रांती चौक येथे समारोप झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivjayanti in Aurangabad Aurangabad News