धक्कादायक...हाताच्या नसा कापून घेत मायलेकीची आत्महत्या, मुलाची मृत्यूशी झुंज सुरु

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 August 2020

रुस्तुम आणि समिना यांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. रुस्तुम यांचा कोरोनाने बळी घेतला, तेव्हापासून समिना खचली होती. त्यांचे कशातही लक्ष लागत नव्हते. त्यामुळेच त्यांना नातेवाइकांनी धीर देण्याचा खूप प्रयत्न केला परंतु समिना यांच्या मनात जीवन संपविण्याचे विचार येत होते. पतीच्या निधनाचे दुःख असह्य झाल्याने अखेर त्यांनी जीवन संपविले. यात मुलीचाही मृत्यू झाला. एका अर्थाने कोरोनाने अख्खे कुटुंबच उद्‍ध्वस्त करून टाकले. 

औरंगाबाद - सहा दिवसांपूर्वी पतीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. घरातील कर्ता माणूस गेल्याने दुःखाचा डोंगर कोसळला. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या पत्नीने दोन मुलांसह हाताच्या नसा कापून घेतल्या. या घटनेत मायलेकीचा मृत्यू झाला, तर मुलगा मृत्यूशी झुंज देत आहे. ही खळबळजनक घटना गारखेड्यातील भारतनगरात घडली. या घटनेने गारखेड्यासह शहरात हळहळ व्यक्त होत आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा 

२५ वर्षांपूर्वी झाला होता प्रेमविवाह 
समिना रुस्तुम शेख (४२) आणि आयेशा रुस्तुम शेख (१७) अशी मृत्युमुखी पडलेल्या मायलेकींची नावे आहेत. या घटनेत समीर रुस्तुम शेख (१७) याच्यावर उपचार सुरू आहेत. बांधकाम व्यावसायिक रुस्तुम शेख (रा. गारखेडा) यांच्यासोबत समिना यांचा २५ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना समीर आणि आयेशा ही जुळी अपत्ये झाली. रुस्तुम आणि समिना यांचे परस्परांवर आणि कुटुंबीयांवर खूप प्रेम होते. रुस्तुम यांचा कोरोनामुळे शुक्रवारी (ता.३१) बळी गेला. त्यावेळी रुस्तुम यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचे काही बरेवाईट झाल्यास आपणही या जगात राहणार नाही, असे समिना यांनी नातेवाइकांसमोर बोलून दाखविले होते. कोरोनामुळे रुस्तुम यांचा मृत्यू झाला तेव्हापासूनच समिना आणि तिच्या मुला-मुलीला मोठा धक्का बसला. समिना यांनी टोकाचे पाऊल उचलू नये म्हणून नातेवाईक त्यांच्यासोबत राहत होते. प्रत्येक जण लक्ष ठेवून होता. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

समिनाने लिहिली ‘सुसाईड नोट’
मंगळवारी (ता. चार) रात्री दहा वाजता समिना, आयेशा आणि समीर यांनी समिनाची लहान बहीण, भाऊ आणि भावजय यांच्यासोबत जेवण केले. नंतर रात्री समिनाने ‘सुसाईड नोट’ लिहिली. त्यानंतर गळफास घेण्याचा प्रयत्न केला. नंतर तिघांनीही हातांच्या नसा धारदार ब्लेड आणि चाकूने कापून घेतल्या. या घटनेत तिघेही बेशुद्ध पडले. बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास शेजारच्या खोलीत राहणाऱ्या अमोल मधुकर याने दार ठोठावले. मात्र, आतून प्रतिसाद न मिळाल्याने अन्य नातेवाइकांच्या मदतीने दार तोडण्यात आले. तेव्हा समिना आणि आयेशा बेडवर, तर समीर बेडजवळ खाली बेशुद्धावस्थेत पडलेला होता. तिघा मायलेकांना एमजीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी समिना आणि आयेशा यांना तपासून मृत घोषित केले. समीर याच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking ... Suicide of a girl with her mother by cutting the veins of her hand