दागिने चोरीप्रकरणी सहा दरोडेखोर अटकेत, मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी

सुषेन जाधव
Monday, 4 January 2021

शिवाजीनगरात (कुंभेफळ) दरोडा टाकून दोन लाखांचे दागिने लांबविल्याप्रकरणी करमाड पोलिसांनी सहा दरोडेखोरांना शनिवारी (ता.२) दुपारी बेड्या ठोकल्या.

औरंगाबाद : शिवाजीनगरात (कुंभेफळ) दरोडा टाकून दोन लाखांचे दागिने लांबविल्याप्रकरणी करमाड पोलिसांनी सहा दरोडेखोरांना शनिवारी (ता.२) दुपारी बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे सहाही दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेने फुलंब्री पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक केली होती. त्यावेळी आरोपींनी शिवाजीनगरातील दरोड्याची कबुली दिली. राधेशाम उर्फ राजा रामराव चिखले (३२, रा. परतूर, जालना ह.मु. पुंडलीकनगर), बलवान चैनसिंग पवार (२५), भिमसिंग चैनसिंग पवार (३०, रा. दोघे रा. मुरादपूर ता.जि. गुणा मध्यप्रदेश, ह.मु. वंजारवाडी), राजेश उर्फ भालकर विठ्ठल सोळंकी (२०), हेमराज करणसिंग सोळंकी (१९, दोघे रा.सावंगी तुळजापूर शिवार ता.जि. औरंगाबाद), कृष्णा उर्फ बाळू धोंडीराम दहिवाळ (२५, रा. बाजी उमरद ता.जि. जालना, ह.मु. प्रकाशनगर, रामनगर) अशी दरोडेखोरांची नावे आहेत.

 

 

 
 

प्रकरणात मंगेश हरिभाऊ झोरे (२६, रा. साखरखेर्डा ता. सिंदखेड राजा, ह.मु. शिवाजीनगर कुंभेफळ) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, मंगेश झोरे हे ग्रीव्हज कॉटन कंपनीत तर त्यांचे वडील हरिभाऊ झोरे हे हरमन फार्मा कंपनीत काम करतात. २३ मार्च रोजी पहाटे दरोडेखोरांनी झोरे यांच्या घरात घुसून मंगेश यांच्या आईच्या गळ्याला चाकू लावून सोन्याची पोत व कानातील सोन्याचे पत्‍ते काढुन घेतले. हरिभाऊ झोरे यांना आवाज आल्याने त्यांनी दरोडेखोरांचा प्रतिकार केला, मात्र दरोडेखोरांनी त्यांच्याशी धक्‍काबुक्‍की केली. तसेच कपाटातील सुमारे एक लाख ९३ हजार ५०० रुपयांचे दागिने लांबविले.

 

 

 

 

दरोडेखोरांनी पळ काढल्यानंतर मंगेश यांच्या आई वडीलांनी त्यांच्या रुमचा दरवाजा उघडला. करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान वरील सहा आरोपींना करमाड पोलिसांनी हर्सुल कारागृहातून ताब्यात घेत अटक केली. दरोडेखोरांना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले असता, दरोडेखोरांना पाच जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. एच. जोशी यांनी रविवारी (ता.३) दिले. सुनावणीवेळी सहाय्यक सरकारी वकील सुर्यकांत सोनटक्के यांनी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती केली.

 

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six Thieves Arrested For Stealing Necklaces Aurangabad News