CoronaVirus : कोरोनाची टांगती तलवार अन् पगाराचीही मारामार! 

अनिलकुमार जमधडे
Wednesday, 22 July 2020

पॉझीटिव्ह-निगेटीव्ह पेशंट एकाच बसमध्ये! 

स्मार्ट शहर बसच्या चालकांवर कोरोनाची टांगती तलवार,

सोयीसुविधांचाही अभाव 

औरंगाबाद ः कोरोना रुग्णांसाठी स्मार्ट शहर बस तैनात आहेत. मात्र, या बस वेळेवर सॅनिटाईज केल्या जात नसल्याने धोका वाढत आहे. दुसरीकडे अहोरात्र ड्युटी करणाऱ्या चालकांनाही सोयीसुविधा नाहीत. कायम कोरोनाची टांगती तलवार डोक्यावर असताना वेतनही मिळत नसल्याने कर्मचारी हतबल झाले आहेत. 

कोरोनाविषयक कामांसाठी ७० शहर बस कार्यरत आहेत. शहरातील पॉझीटीव्ह रुग्णांना कोवीड सेंटर आणि घाटी किंवा मिनी घाटी रुग्णालयापर्यंत सोडण्याची जबाबदारी या स्मार्ट शहर बसवर आहे. त्याचप्रमाणे केंब्रीज, झाल्टा फाटा, नगरनाका, दौलताबाद टी पॉइंट, हर्सुल टी पॉइंट, कांचनवाडी अशा विविध रस्त्यांवर शहराकडे येणाऱ्या रुग्णांची कोरोना चाचणी घेतल्यानंतर त्यांना क्वारंटाईन सेंटरपर्यंत सोडणे यासाठी सकाळी आठ ते रात्री नऊपर्यंत दोन शिफ्टमध्ये स्मार्ट शहर बस कोरोना रुग्णांच्या सेवेत आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

निर्जंतुकीकरण नावालाच 

कोरोना रुग्णांना सोडणे, निगेटीव्ह असलेल्यांना घरी नेणे ही कामे स्मार्ट बस करीत आहे. त्यामुळेच या गाड्या प्रत्येक फेरीनंतर सॅनिटाईज करणे आवश्यक आहे. यासाठी एक कर्मचारी प्रत्येक बसमध्ये नियुक्त केलेला आहे. मात्र हे कर्मचारी प्रत्येक फेरीनंतर बस सॅनिटाईज करत नसल्याचे चालकांनी सांगीतले. एकाच बसमध्ये कोरोनाचे पॉझिटीव्ह आणि निगेटीव्ह रूग्णांची ने-आण सुरू असल्याने कोरोना नसलेल्यांनाही संसर्ग होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

बसचा पडदा नावलाच 

कोरोनाच्या रुग्णांची वाहतूक करताना चालकाला बाधा होऊ नये यासाठी बस चालकाच्या पाठीमागे पारदर्शक पडदा लावलेला आहे. मात्र, हा पडदा केवळ नावापुरताच आहे. तो बाजुला करुन कोरोनाग्रस्त रुग्ण चालकाला बस कुठे चालली, कुठे थांबणार असे प्रश्न विचारत असतात, त्यामुळे चालकालाही संसर्ग होण्याच्या धोक्याची कायम असते. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

वेतनही मिळेना 

स्मार्ट शहर बसचे चालक कोरोनायोद्धा आहेत. त्यामुळे त्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे सोयी सुविधा आवश्यक आहे. मात्र मास्क आणि दोन तीन दिवसाला एक सॅनिटायझरची छोटी बाटली याशिवाय त्यांना काहीही मिळत नाही. बस थांबवण्यासाठी जागा नसल्याने महापालिकेच्या परिसरातील रस्त्यांवर उभे रहावे लागते. चालकांना स्वच्छतागृह, जेवण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी जागा नाही. त्यातच दोन महिन्यात ५० टक्के वेतन मिळाले पण जूनचा पगार अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळे कुटूंबाची उपजिविका भागवताना चालकांची अक्षरशः दमछाक होत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smart city bus drivers on corona duty did not get paid