esakal | कुणाला ताप, कुणाला सर्दी...औरंगाबादेत भाजी विक्रेत्यांची तपासणी
sakal

बोलून बातमी शोधा

Corona News Aurangabad

महापालिकेने १५१ भाजीविक्रेत्यांची तपासणी केली असता त्यातील १६ जणांना किरकोळ आजार असल्याचे समोर आले. त्यानुसार त्यांना पुढील उपचारासाठी महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर पाठविण्यात आले. 

कुणाला ताप, कुणाला सर्दी...औरंगाबादेत भाजी विक्रेत्यांची तपासणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शहरात कोरोनाची रुग्णसंख्या गेल्या महिनाभरात झपाट्याने वाढली. काहींना थेट संपर्कातून तर अनेकांना संपर्कातील संपर्कातून कोरोनाची बाधा झाली. किराणा दुकानदार, भाजीविक्रेत्यांपासूनही काहींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. दरम्यान, महापालिकेने १५१ भाजीविक्रेत्यांची तपासणी केली असता त्यातील १६ जणांना किरकोळ आजार असल्याचे समोर आले. त्यानुसार त्यांना पुढील उपचारासाठी महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर पाठविण्यात आले. 

महापालिकेने गजानन महाराज मंदिराशेजारी असलेल्या कडा कार्यालयाच्या मैदानावर भाजीमंडई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी भाजी व फळे विक्रीसाठी येणाऱ्या विक्रेत्यांची मंगळवारी जैन संघटना व महापालिका व डीकेएमएम हॉस्पिटलतर्फे आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात १५१ भाजीविक्रेत्यांची तपासणी करण्यात आली असता, त्यातील काहींना सर्दी, काहींना ताप व इतर किरकोळ त्रास असल्याचे समोर आले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

त्यामुळे १६ जणांना पुढील उपचारासाठी महापालिकेच्या आरोग्य केंद्रात पाठविण्यात आल्याचे वॉर्ड अधिकारी महावीर पाटणी यांनी सांगितले. आरोग्य शिबिरासाठी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, जैन संघटनेचे विभागीय अध्यक्ष पारस चौडिया यांनी पुढाकार घेतला. डॉ. प्रथमेश काळमेघ, आरोग्यसेविका श्रीमती पाखरे, प्रकाश कोटेचा यांनी उपचार केले. 

‘मी कंटेनमेंट झोनमधील नाही’ 
कडा कार्यालयाच्या मैदानावर भाजीपाला-फळे विक्रीसाठी येणाऱ्या विक्रेत्याकडून स्वयं घोषणापत्र लिहून घेतले जात आहे. त्यात मी कंटेनमेंट झोनमधील रहिवासी नाही, माझा नातेवाईक कोरोनाबाधित नाही. व्यवसायाच्या ठिकाणी सुरक्षित अंतर पाळले जाईल, मास्क, सॅनिटायझरचा वापर, वारंवार हात धुणे असे नियम पाळले जातील, असे लेखी घेतले जात आहे. 

विद्यानगरमधील भाजीमंडई अखेर सील 
विद्यानगर वॉर्डात गुरू रामदास कॉम्प्लेक्स येथील भाजीमंडईमध्ये सुरक्षित अंतर पाळले जात असल्याने अखेर महापालिकेने ही भाजीमंडई सील केली आहे. तसेच गजानन महाराज मंदिर ते पुंडलिकनगर व रिलायन्स मॉल ते सेव्हन हिल या रस्त्यावर बसणाऱ्या भाजीविक्रेत्यांना कडा कार्यालयाच्या मोकळ्या मैदानावर स्थलांतरित करण्यात आले आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा