सोयाबीन पडतेय पिवळे...अशी घ्या काळजी

सुषेन जाधव
शनिवार, 11 जुलै 2020

कधी अपुरे पर्जन्यमान तर कधी हवामानाचा फटका, तर कधी कीडरोगांचे थैमान या कचाट्यातून पीक निघते तोच कोसळलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहत आहे. सध्या मराठवाडयात बहुतांश ठिकाणी सोयाबीन पीक पिवळे पडले आहे.

औरंगाबाद: कधी अपुरे पर्जन्यमान तर कधी हवामानाचा फटका, तर कधी कीडरोगांचे थैमान या कचाट्यातून पीक निघते तोच कोसळलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहत आहे. सध्या मराठवाडयात बहुतांश ठिकाणी सोयाबीन पीक पिवळे पडले आहे.

क्लिक करा- ...अन्यथा विभागीय कृषी सहसंचालकांना अटक करुन उच्च न्यायालय खंडपीठात हजर करा 

लोह (फेरस) या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सोयाबीनच्या झाडामध्ये ‘क्लोरोसिस’ ही लक्षणे दिसतात, अर्थात सोयाबीनची पाने पिवळी पडतात, असे निरीक्षण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे नोंदविण्यात आले आहे. यावर वेळीच उपाय करण्याचे आवाहन वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सु. बा. पवार यांनी केले आहे. 

सोयाबीनमध्ये फेरसची कमतरता भासली की कोवळी पाने पिवळी होतात. हरितद्रव्याच्या अभावामुळे पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो आणि शिरा फक्त हिरव्या दिसतात. सोयाबीनचे प्रथम ट्रायफोलिएट पाने हिरवी राहतात कारण लोह हे अन्नद्रव्य अचल (वाहू न शकणारे) आहे. लोह रोपट्यात स्थिर होऊन साठविले जाते. पाने पिवळी पडल्यामुळे हरीतद्रव्य कमी होऊन प्रकाशसंश्र्लेषण क्रिया मंदावते, वाढ खुंटते आणि उत्पादनही कमी होते. त्यामुळे कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार योग्य उपाय करण्याचे आवाहन शास्त्रज्ञांनी केले आहे. 

हेही वाचा- आमदार कुचे यांच्यासह भाऊ, युवतीविरोधात गुन्हा दाखल, युवतीकरवी भाच्यालाच पाठविले अश्लिल संदेश 

अन्नद्वव्याची कमतरता का भासते? 
परभणी कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या मते, फेरसची कमतरता विशेषत: कमी प्रमाणात निचरा होणाऱ्या चुनखडीयुक्त जमिनीत होते. वनस्पतींमध्ये हिरवे रंगद्रव्य क्लोरोफिल तयार करण्यासाठी लोह (फेरस) आवश्यक असते.

बहुतेक जमिनीत वनस्पतींच्या आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात लोह हे सूक्ष्म अन्नद्रव्य असते. बऱ्याचदा जमिनीचा सामू (पीएच) ७.५ पेक्षा जास्त असतो त्या जमिनीतील लोह उपलब्ध स्थितीत न राहता फेरीक स्वरूपात जातो आणि तो पिकांना शोषून घेता येता नाही. त्यामुळे पिकांना लोहाची कमतरता भासते. 

‘‘सोयाबीन पिकात पाऊस पडून पाणी साचले असेल तर पाण्याचा निचरा करावा, ०.५ टक्के फेरस सल्फेटची फवारणी करावी. वाफसा येताच कोळपणी व खुपरणी आदि आंतरमशागतीचे कामे करावी. १९ः१९ः१९ शंभर ग्रॅम आणि सुक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड टू ५० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात फवारावी. 
-डॉ. सु. बा. पवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, औरंगाबाद. 

हेही वाचा- कोरोनाचे सर्वच रेकॉर्ड जपून ठेवा, खंडपीठ करणार पाहणी  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soyabin Marathwada News